मुंबई- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा ही संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीचा काळ 14 एप्रिलला केंद्राने 3 मेपर्यंत वाढविल्यानंतर रेल्वेसेवाही 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना बसला आहे. विशेष करुन प्रवाशांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या हमाल मजुरांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
कोरोना इफेक्ट; संचारबंदीत हातावर पोट असलेल्या रेल्वे हमालांची उपासमार, व्यक्त केल्या 'या' अपेक्षा रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात रेल्वेच्या सर्वाधिक एक्स्प्रेस गाड्या ये-जा करतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर या एक्स्प्रेस गाड्यांच्या भरोशावर गेली अनेक वर्षे जवळपास 90 ते 100 हमालांचे कुटुंब जगत आहे. दिवसभरात येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची ओझी वाहून येथील हमाल व एरवी दिवसाला 500 रुपयांची कमाई करत होते. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे रेल्वेही 24 एप्रिलपासून बंद करण्यात आल्या. त्यामुळे सीएसटीएमवरील हमाल मजुरांचे हाल सुरू झाले आहेत. घरात आई वडील, बायको, 2 मुलांचा परिवार असलेले हमाल मजूर आजपर्यंत काटकसर करीत कुटुंबाचा गाडा हाकत आले आहेत. मात्र कुठलेही काम नसल्याने बहुतांश हमालांनी आपल्या गावाची वाट धरली. तर काही जणांनी रेल्वे सुरू होईल, म्हणून मुंबईत आपल्या घरात थांबणे पसंद केले. पण रेल्वे बंद असल्याने आता 2 वेळच्या जेवणाचे काय करायचे, हा प्रश्नही आता हमाल मजुरांना भेडसावू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार लायसन्स पोर्टर भागीदारी मंडळाचे मंगेश आव्हाड यांच्या मतानुसार आतापर्यंत काही हमाल मजुरांना काही जणांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. पण आता तीही संपल्याने पुढे काय हा प्रश्न हमाल मजुरांच्या कुटुंबासमोर आला आहे. या मजुरांसाठी प्रशासनाने योग्य ती मदत जाहीर केल्यास हमाल, मजुरांना संचारबंदीच्या काळात दिलासा मिळेल, अशी मागणी हमालाकडून करण्यात येत आहे.