मुंबई -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा लावून राजकारणात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. पटोले यांच्या या वक्तव्यावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. आपल्यावर अजित पावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाळत ठेवत असल्याचे पटोले यांनी वक्तव्य करुन आघाडीत बिघाडी झाल्याचे उघड झाले. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी, शिवसेनेने खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पटोले यांची खिल्ली उडवली. तर खुद्द शरद पवार यांनी नाना पटोलेसारख्या लहान माणसावर मी बोलणार नसल्याचे सांगत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची अवकळा काढली. त्यामुळे नाना पटोले आपल्या चक्रव्युहात फसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अशी पडली आघाडीत वादाची "ठिणगी" . . .
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष भविष्यात सर्वच निवडणुका एकत्र लढतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 जूनला केले सांगितले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याने व्यथित झालेल्या नाना पटोले यांनी अकोल्याच्या कार्यक्रमात 'मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मी जाहीर करेन. दुसऱ्यांना आमच्या पक्षाची भूमीका जाहीर करता येणार नाही. त्यामुळे शरद पवार नेमके काय बोलले आणि त्यामागील त्यांची भूमिका काय हे माहीत नाही. काँग्रेसने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे, असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले. पटोले यांनी स्वबळाची भाषा करुन थेट शरद पवार यांनाच आव्हान दिल्याने आघाडीत खळबळ उडाली. येथूनच राष्ट्रवादी आणि पर्यायाने शरद आणि नाना पटोले यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.
काय आहे संजय राऊत आणि नाना पटोलेंचा वाद . . .
यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. आता मात्र देशात वेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत संजय राऊत यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्याचा नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना हा यूपीएचा घटकपक्ष नाही, त्यामुळे त्यांना याबाबत बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत पटोले यांनी संजय राऊतांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली होती. संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का, असा सवालही पटोले यांनी पत्रकार परिषदेत विचारला होता. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडल्या. शिवसेनेच्या मुखपत्रातून बुधवारी संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या पायाखालची सरकली वाळू . . .
राज्यात काँग्रेस पक्ष बळकट होत असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी लोणावळा येथील कार्यकर्त्यांच्या सभेत केला आहे. मी कुठे जातो, कुणाला भेटतो, काय करतो याबाबत संपूर्ण माहिती पोलिसांमार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिली जात असल्याचे त्यांनी सांगून खळबळ उडवून दिली. मी स्वबळाचा नारा दिल्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे उघड झाले. त्यानंतर मात्र राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते नाना पटोले यांच्यावर तुटून पडले. त्यामुळे नाना पटोले यांनी आपल्या या वक्तव्यावरुन घुमजाव केले. आपल्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केल्याचा राग पटोले यांनी आळवला.