महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Congress And NCP Dispute : राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला ते झाकली मूठ . . . काँग्रेस व राष्ट्रवादीतील खडाजंगीचा भाजपला होऊ शकतो फायदा - राष्ट्रवादी आणि काँग्रेस अंतर्गत वाद

राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलगीतुरा वाढला आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य हे हास्यास्पद असून, नाना हे स्वतः कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते पहावे. नाना अगोदर काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले व पुन्हा काँग्रेसमध्ये आले. अशा लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून ते पुढे गेले असे आम्ही म्हटले तर ते चालेल का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

Congress And NCP Dispute
ग्रेस व राष्ट्रवादीतील खडाजंगीचा भाजपला होऊ शकतो फायदा

By

Published : May 13, 2022, 3:08 PM IST

Updated : May 13, 2022, 3:30 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलगीतुरा वाढला आहे. यापूर्वीसुद्धा नाना पटोले त्यांच्या बेलगाम वक्तव्याने चर्चेमध्ये राहिलेले आहेत. परंतु यंदा त्यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. याबाबत बोलताना त्यांनी, 'झाकली मूठ सव्वा लाखाची' या उक्तीप्रमाणे नानांचे वागणे योग्य ठरेल, असा सल्ला नाना पटोले यांना दिला आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील खडाजंगीचा भाजपला फायदा होण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

नाना पटोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल -भंडारा व गोंदियामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पक्षांतर्गत बदलांवर नाना पटोले यांनी राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी त्यांनी, बेइमानी आमच्या रक्तात नाही, मात्र भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत सुरा खुपसला अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणात स्व:ताला विकासपुरुष म्हणून मिरविणाऱ्या लोकांनी जिल्ह्यातील राजकारण गलिच्छ करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांच्यावर केला होता. त्यावरून त्यांचे हे वक्तव्य सध्याच्या घडीला महाविकास आघाडीसाठी घातक असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करणारे आहे.

कसा निर्माण झाला वाद ? -राज्यातील भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत भंडाऱ्यामध्ये अध्यक्षपदी काँग्रेसचा, तर गोंदियामध्ये भाजपचा विजय झाला. मात्र यात भंडाऱ्यामध्ये काँग्रेसला मदत केली, ती भाजपने आणि गोंदियामध्ये भाजपला मदत केली ती राष्ट्रवादी काँग्रेसने. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच आघाडी धर्म गुंडाळून ठेवत विरोधी पक्ष भाजपला साथ दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगलेला आहे.

१४५ बहुमताचा आकडा गाठण्यासाठी तिन्ही पक्षात समन्वय आवश्यक? - नाना पटोले यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाना पटोले यांचे वक्तव्य हे हास्यास्पद असून, नाना हे स्वतः कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते पहावे. नाना अगोदर काँग्रेसमध्ये होते, नंतर भाजपमध्ये गेले व पुन्हा काँग्रेसमध्ये आले. अशा लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून ते पुढे गेले असे आम्ही म्हटले तर ते चालेल का? असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये हेडलाईन मिळवण्याकरता नानाना ते वाक्य बरं वाटत असेल, परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्यापरिने काम करत असतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व काम करतो. परंतु राज्यात निर्णय घेताना राज्य पातळीचे निर्णय वेगळे असतात, जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संघटना काम करतात. काँग्रेस सुद्धा काही ठिकाणी जिल्हा, स्थानिक स्तरावर भाजपबरोबर एकत्र गेलेली आहे. पण मी त्याला फार महत्त्व देत नाही. परंतू जबाबदार नेत्यांनी असे वक्तव्य करताना आपल्या वक्तव्याचा काही वेडावाकडा परिणाम तर होणार नाही ना? याबाबत सुद्धा काळजी घेणे गरजेचे असल्याचे अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा याबाबत बैठक घेतली होती. आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवायची आहे. पण काही ठिकाणी भिन्न प्रश्न निर्माण होतात, तेव्हा जिल्हास्तरावर तिकडचे पालकमंत्री तिकडचे आजी-माजी आमदार, नेते यांना काही प्रमाणात मुभा देण्यात आल्याचेही अजित पवार म्हणाले. आमचे सुद्धा काही कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले आहेत. आम्ही दोघांनी मिळून १५ वर्षे आघाडीचे सरकार चालवले आहे. काही जिल्ह्यांमध्ये आम्ही एकमेकांच्या विरोधात उतरायचो, एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात जायचे. जर एखादी व्यक्ती राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असेल व त्या ठिकाणी जाऊन विरोधी पक्षाची ताकद वाढत असेल तर त्यापेक्षा ती व्यक्ती मित्रपक्षाच्या पक्षामध्ये गेली तर त्यात वाईट वाटण्याचे काही कारण नाही, असे सांगत शेवटी महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहिली पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात मांडणार तक्रार ? -काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी उदयपूर येथे शुक्रवारपासून काँग्रेसचे चिंतन शिबीर सुरू होत आहे. याबाबत पक्षातील असंतुष्ट नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले, तरी हे चिंतन शिबिर कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. चिंतन शिबिरात राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, तरुण आणि पक्ष संघटना या विषयावर चर्चा करण्यासाठी ठराव मंजूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती नेमण्यात आल्या आहेत. या चिंतन शिबिरामध्ये नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस विषयी तक्रार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यात १४ महानगरपालिका आणि २०० नगरपालिकांची निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध ताणले जातील का तेसुद्धा बघणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याने राज्यात स्थानिक स्तरावर निवडणुकीमध्ये या तिन्ही पक्षात अनेकदा अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. सध्या राज्याची परिस्थिती पाहता या आघाडीतील अंतर्गत वादाचा फायदा भाजपला भेटता कामा नये? त्या अनुषंगाने तिन्ही पक्षात समन्वय साधण्याचा प्रयत्न सुद्धा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जाण्याचे संकेत भेटत आहेत.

Last Updated : May 13, 2022, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details