मुंबई - राज्यात पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरु झाला की मुंबईत पावसाचे पाणी साचणे, मॅनहोल, उघडी गटारे, नाले यामध्ये पडून तसेच रस्त्यालगतच्या झाडांच्या फांद्या पडून नागरिकांचा मृत्यू होतो. दरवर्षी प्रमाणे यंदाही महापालिकेने पावसाळ्यासाठी आपण सज्ज असल्याचे म्हटले आहे. मात्र मुंबईमध्ये आजही सुमारे १४ हजार झाडांची छाटणी बाकी आहे. ही छाटणी न झालेली झाडे रस्त्याच्या कडेला उभी आहेत. मुसळधार पाऊस आणि वादळ आल्यास ही झाडे कोसळून जीवित आणि वित्त हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान अशा दुर्घटना झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
१४ हजार झाडांची छाटणी बाकी -मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. मुंबईत रस्त्यालगत १ लाख ९२ हजार ५५९ एवढी झाडे असून त्यातील १ लाख ५४ हजार १९३ झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १ लाख ०४ हजार ७० झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याची गरज असल्याचा अहवाल बनवण्यात आला. त्यानुसार ९० हजार झाडे आणि त्यांच्या फांद्या तोडण्यात आल्या असल्या, तरी अद्याप १४ हजार झाडे रस्त्याच्या कडेला उभी आहेत. रस्त्यालगतच्या झाडांचा सर्व्हे करण्यात आला, यात ५२३ झाडे ही मृत अवस्थेत आढळून आली होती. त्यातील ५१२ झाडे तोडण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक बोरीवली (६२००), वडाळा, शिवडी (६१०२), मालाड (५९९५), घाटकोपर (५८१६), अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम (५२८५), गोरेगाव (५२५६) आदी भागांमध्ये सर्वाधिक झाडांच्या फांद्यांची छाटणीचे काम झाल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे.
८० टक्के सोसयट्यामधील झाडांची छाटणी पूर्ण - मुंबईमध्ये रस्त्यावर, उद्यानात, सरकारी जागेत तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांच्या हद्दीत झाडे आहेत. महापालिकेकडून रस्त्याच्या कडेची आणि महापालिकेच्या हद्दीतील झाडांची छाटणी केली जाते. खासगी आणि सरकारी जागेतील झाडांची छाटणी करण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटीस दिली जाते. अशा एकूण ९४८८ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी ८० टक्के सोसायट्यांनी अर्ज करून आपल्या परिसरातील झाडांच्या फांद्या छाटल्याची माहिती उद्यान विभागाने दिली.
१५ जून पर्यंत काम पूर्ण होईल -मुंबईमध्ये झाडांची छाटणी करताना अति धोकादायक, धोकादायक, कमी धोकादायक अशी विभागणी केली जाते. अति धोकादायक, धोकादायक झाडांची छाटणी करण्यात आली आहे. ज्या झाडांमुळे नागरिकांना धोका नाही, अशा झाडांची छाटणी सुरु आहे. १५ जूनपर्यंत ही कामे पूर्ण होतील. महापालिकेने खासगी सोसायट्या आणि सरकारी जागेत झाडांची छाटणी करण्यासाठी ९ हजाराहून अधिक नोटीस दिल्या आहेत. त्यापैकी ८० टक्के सोसायट्यांनी अर्ज करून झाडांची छाटणी करण्याचे काम सुरु केले आहे. इतरांचे कामही १५ जूनपर्यंत पूर्ण करून घेतले जाईल, असे पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
तर महापालिका प्रशासन जबाबदार - झाडांची छाटणी झाली की नाही, हे कोणी पाहिले आहे. पालिका कंत्राटदारांची बिले मंजूर करतात. मुंबईमध्ये झाडे किंवा फांद्या पडून दुर्घटना घडल्या आणि त्यात मृत्यू झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे.
झाड पडून मृत्यू
22 जुलै 2017 -
चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये दूरदर्शनच्या माजी वृत्त निवेदिका कांचन रघुनाथ या मॉर्निंग वॉकला जाताना अंगावर नारळाचे झाड कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
7 डिसेंबर 2017 -
डायमंड गार्डन परिसर, चेंबूरमध्ये बस स्टॉपवर बसची वाट पाहत बसलेल्या शारदा घोडेस्वार यांच्यावर झाड कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
19 एप्रिल 2018 -
दादर पूर्व भागात दिनेश सांगळे हे दुपारच्या जेवणासाठी आले होते. ते फुटपाथवरुन चालत असताना, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय परिसरात, त्यांच्या अंगावर झाड कोसळले. त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
29 मे 2018
वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून ९१ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुखी लीलाजी असे मृत महिलेचे नाव आहे. सुखी लीलाजी फेरफटका मारण्यासाठी बाणगंगा तलावाजवळ गेल्या होत्या. त्यावेळी एका झाडाची फांदी त्यांच्यावर कोसळली. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
24 जून 2018
मुंबईतील आझाद मैदानाजवळ झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर होती. गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर जीटी रुग्णालयात आयसीयूत उपचार करण्यात आले. सायंकाळी घराकडे परतणाऱ्या तसेच खाद्यपदार्थाच्या स्टॉलजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींवर ही फांदी पडली. बारसिंग असे या व्यक्तीचे नाव असून तो 60 वर्षांचा आहे.
14 जून 2019
मालाड एस व्ही रोडवरील नारियलवाला कॉलनीजवळून जात असताना शैलेश राठोडच्या अंगावर झाडाची फांदी कोसळली. यामध्ये शैलेश यांचा मृत्यू झाला.
14 जून 2019
जोगेश्वरी पूर्वेकडील मेघवाडी परिसरातील तक्षशिला सोसायटीत वाहनचालक म्हणून काम करणारा इसम कार स्वच्छ करत होता. त्यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गुलमोहराचं झाड त्याच्या अंगावर कोसळलं. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत वाहनचालकाला हॉली स्पिरिट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत इसमाचे नाव अनिल नामदेव घोसाळकर (४८) असे आहे.
13 जानेवारी 2022
मुंबई - मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी पतंग उडवताना अंगावर अचानक नारळाचे झाड पडल्याने अनिरुद्ध सुजीत मचाड (१३) याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अनिरुद्ध सहार गावच्या रोझमेरी चाळीत आईवडील तसेच मोठ्या भावासह राहत होता.