महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई, उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

व्हीव्हीपॅट यंत्र

By

Published : Apr 15, 2019, 12:49 PM IST

मुंबई - येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व स्तरातील व्यक्तींना मतदानचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी विशेष टोल फ्री क्रमांक सुविधा देखील देण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ व्हावे, यादृष्टीने मतदानाच्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींची नाव नोंदणी करणे व आवश्यक ते समन्वयन साधण्यासाठी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिव्यांग मतदार मदत केंद्राचे' लोकार्पण जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९' करीता निवडणूक आयोगाने यंदा "दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका" हे घोषवाक्य निश्चित केले आहे. त्यानुसार दिव्यांग मतदारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचीही तयारी सुरू आहे. याच तयारीचा भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात 'दिव्यांग मतदार मदत केंद्र' सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत दिव्यांग मतदारांशी संपर्क साधण्याच्या कार्यवाहीचे समन्वयन केले जाणार आहे, तसेच दिव्यांग मतदार देखील आवश्यकतेनुसार या केंद्रांशी संपर्क साधू शकणार आहेत.

दिव्यांग मदत केंद्राद्वारे दिव्यांग मतदारांशी संपर्क साधून त्यांना प्रशासनामार्फत मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या ४ हजाराहून अधिक असून त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय दिव्यांग मतदारांना आपल्या निवडणूक विषयक शंकांचे निरसन करण्यासाठी मदत केंद्रातील स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यासाठी दिव्यांग मदत केंद्राच्या ९८६९-५१५-९५२, ८६५५-२३५-७१४ आणि ०२२-२६५१-००२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

मोफत वाहन सुविधेच्या नोंदणीसाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा मतदार क्रमांक व लोकसभा मतदार संघ क्रमांक आदी तपशील लघुसंदेशाद्वारे (SMS) किंवा व्हाट्सऍप संदेशाद्वारे ९८६९-५१५-९५२ किंवा ८६५५-२३५-७१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविल्यास वाहन नोंदणी केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी त्यांना घेण्यासाठी येणाऱ्या वाहनाचा क्रमांक व वेळ ही दिव्यांग मतदाराच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे.

याचबरोबर मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग तसेच डोली आदी सुविधा देखील असणार आहेत. मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबविली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details