मुंबई -विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. त्यानुसार आज विधानसभा अध्यक्षपदाचा निवडणूकीविषयी महाविकास आघाडी सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. नुकतीच विधानसभा अध्यक्षपदाचा चर्चेसाठी विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे संग्राम थोपटे हेच विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संग्राम थोपटे हे पक्षासाठी काम करत आहेत. मात्र, त्यांना कोणतेही मंत्रिपद न दिल्याने नाराज होते. त्यामुळे नाराज संग्राम आता विधानसभाध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाविकास आघाडी समान कार्यक्रमात काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद आहे, त्यामुळे निवडणूक तातडीने घेण्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली. नाना पटोले यांनी महिन्याभरापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, विधानसभा अध्यक्षांची खुर्ची अद्यापही रिकामीच आहे. त्यामुळे याच अधिवेशनात ही निवडणूक घेऊन अध्यक्ष करणार असल्याचे ही सांगितले जात आहे.