मुंबई - लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप परत पाठवण्यासाठी सोनू सूद प्रयत्नशील आहे. सोमवारी रात्री त्याने आझमगडला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी खास ट्रेनची व्यवस्था केली होती. वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या या ट्रेनमधील मजुरांना प्रवासाकरिता शुभेच्छा द्यायला तो वांद्रे टर्मिनसवर दाखलही झाला. मात्र आरपीएफच्या जवानांनी त्याला गाडीपर्यंत जाण्यास रोखले.
आरपीएफ जवानांनी सोनू सूदला वांद्रे टर्मिनसला जाण्यापासून रोखले - सोनू सूदला आरपीएफ पोलिसांनी रोखले
सोनू सूदने आजवर हजारो स्थलांतरित मजुरांना त्याच्या गावापर्यंत सुखरुप पोहोचवले. सोमवारी रात्री आझमगडला जाणाऱ्या प्रवाशांसाठी त्याने ट्रेनची व्यवस्था केली होती. मात्र स्टेशनच्या फलाटवर जाण्यापासून आरपीएफ जवानांनी त्याला रोखल्याचे समोर आले आहे.

सोनू सूद याने स्थलांतरित मजुरांसाठी उत्तर प्रदेशमधील आझमगडला जाण्यासाठी खास ट्रेनची व्यवस्था केली होती. जेव्हा तो या मजुरांना भेटायला वांद्रे टर्मिनसला पोहोचला तेव्हा, त्याला फलाटावर जाण्यासाठी प्रवेश नाकारला गेला. त्यामुळे त्याला स्थानकाबाहेरून परत जावे लागले. सोनू आरपीएफ कार्यालयात सुमारे 45 मिनिटे रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलत होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा ट्रेनने आधीच फलाट सोडले होते. 'मला फलाटावर प्रवेश करण्याची परवानगी आहे की नाही, याची मला पर्वा नाही, हे स्थलांतरित सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहचतील, ही व्यवस्था करण्याचे माझे काम आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो होतो', असे सोनू यांनी सांगितले.
मुंबई रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडून यासाठी ऑर्डर नसल्याने सोनूला फलाटावर जाण्यासाठी रोखण्यात आले, असे आरपीएफकडून सांगण्यात आले. सोनू सूद यांच्या मदतीवरून सध्या राजकारण रंगले आहे. भाजपा-शिवसेना सोनू सूदच्या मुद्यावरून आमनेसामने आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनू सूदच्या करीत असलेल्या मदतीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनू सूदला दत्तक घेऊन महाराष्ट्र सरकार काही काम करत नाही, असे चित्र भाजपाकडून उभे केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.