मुंबई -काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीत बिघडीची चिन्ह दिसत असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमानुसार कारभार करण्याची आठवण करून दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली. यासंदर्भात सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना 14 डिसेंबररोजी एक पत्र दिल असल्याचे ही सांगितले.
सरकारची वर्षपूर्ती
महाविकास आघाडी सरकारने नुकतीच आपली वर्षपूर्ती साजरी केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी या आधी ही निधीबाबत नाराजी व्यक्त केलेली असताना, आता थेट सोनिया गांधी यांनीच मुख्यमंत्री ठाकरे यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने आघाडीत मतभेद असल्याचे उघड झाले आहे. मात्र याबाबत काँग्रेस नेते बोलण्यास तयार नाहीत. वर्षपूर्ती निम्मित ईटीव्ही भारतने काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत साधलेल्या संवादात हे भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने अडचणी निर्माण होतात, पण सरकार किमान समान कार्यक्रमावर भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
काय म्हणाल्या आहेत सोनिया गांधी?
- महाविकास आघाडी सरकारबाबत सोनिया गांधी यांनी चार प्रमुख गोष्टींवर भर देण्याची मागणी केली आहे.
- अनुसूचित जाती-जमाती यांच्या रिक्त जागा लवकर भराव्यात
- आदिवासी विकास योजनांना आवश्यक तो निधी देऊन, यासंदर्भातील कार्यवाही करावी
- आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात
- अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात तरतूद करावी
महाविकास आघाडी सरकार केवळ किमान समान कार्यक्रमावर आधारित आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमांत नमूद केलेल्या बाबी सुरळीत होण्यासाठी मार्गक्रमण करणे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, असेही गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.