वर्दीतील दर्दी.. रेहाना शेख यांनी जपली 'खाकी'तली माणूसकी - महिला पोलीस रेहाना शेख
पोलीस म्हटलं की सामान्य नागरिकांच्या कपाळावर या आठ्या पडत असतातच. पोलीस म्हणजे भ्रष्ट, पोलीस म्हणजे चिरीमिरी घेणारे असा समज नागरिकांमध्ये असताना या उलट महिला पोलीस कर्मचारी रेहाना नासीर शेख यांनी एक आदर्श समाजासमोर घालून दिलेला आहे.
![वर्दीतील दर्दी.. रेहाना शेख यांनी जपली 'खाकी'तली माणूसकी social-work-of-woman-police-personnel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12127846-thumbnail-3x2-police.jpg)
मुंबई - पोलीस म्हटलं की सामान्य नागरिकांच्या कपाळावर या आठ्या पडत असतातच. पोलीस म्हणजे भ्रष्ट, पोलीस म्हणजे चिरीमिरी घेणारे असा समज नागरिकांमध्ये असताना या उलट महिला पोलीस कर्मचारी रेहाना नासीर शेख यांनी एक आदर्श समाजासमोर घालून दिलेला आहे. मुंबई पोलीस खात्यात महिला पोलीस नाईक पदावर काम करणाऱ्या रेहाना नासीर शेख यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील धामणी येथील ज्ञानाई विद्यालयातील या 50 मुलांना शैक्षणिक मदत म्हणून दत्तक घेण्यात आलेले आहे. कोरोना संक्रमणाच्या महामारीत या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आतापर्यंत 54 जणांना प्लाज्मा उपलब्ध करून दिलेला असून याबरोबरच ऑक्सिजन व बेड मिळवून देण्याची मोलाची कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस खात्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
रेहाना नासीर शेख यांचे पती हे ही मुंबई पोलीस खात्यात असून रेहानाचे वडील हे मुंबई पोलीस खात्यातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले आहेत. पोलीस खात्यात काम करत असताना पोलिसांची कर्तव्य कशाप्रकारे बजावली जातात याचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेले होत. कोरोना या सारख्या महामारीत त्यांना पोलीस खात्यातील काही जणांना प्लाज्मा हवा असल्याचे कळल्यानंतर त्यांनी स्वतःहून यात पुढाकार घेत पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्लाज्मा उपलब्ध करून दिला असून रेहाना यांना येणाऱ्या फोन कॉल्सवर ऑक्सीजन व बेड उपलब्ध करून देण्याची विनंती आली असता त्या सर्व पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करत आहेत.