मुंबई -महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सत्र न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही अंजली दमानिया यांनी दिला.
दमानिया जाणार उच्च न्यायालयात -
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत यासाठी आपल्याला या आरोपातून दोषमुक्त करावे असा अर्ज छगन भुजबळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे एक वर्षापूर्वी केला होता. मात्र आजच्या झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील उपस्थित नव्हते. अशावेळी केसची बाजू कोण मांडणार? असे प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत. सत्र न्यायालयाच्या या निकालानंतर आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.