मुंबई - पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाऊन, असा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवाली आहे. या बैठकीत राज्यात मोठा लॉकडाउन लावायचा की काही वेगळा निर्णय घ्यायचा याबद्दल चर्चा होणार आहे. तसेच राज्यात मोठ्या लॉकडाऊनची गरज नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केले.
कोरोनाची साखळी नक्कीच तोडू-
पालकमंत्री असलम शेख म्हणाले, मुंबईकरांना परिस्थितीची चांगली समज आहे. कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसतोय. अशावेळी शनिवार-रविवारच्या दिवशी अतिमहत्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका, असं सांगण्यात आलं आहे. गेले काही दिवस नाइट कर्फ्यूमध्ये तरूण मंडळी आपल्या बाईकवरून विनाकारण फिरत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आज मी स्वत:च मुंबईच्या रस्त्यांवर लॉकडाऊनच्या अमलबजावणीची पाहणी करण्यासाठी उतरलो आहे. सध्याचे चित्र पाहून खूप बरं वाटतंय की मुंबईची जनता लॉकडाउनला चांगला प्रतिसाद देत आहे. जर अशाच प्रकारे लोकांनी योग्य ते सर्व नियम पाळले तर आपण कोरोनाची साखळी नक्कीच तोडू. मग अशा परिस्थितीत मोठा लॉकडाउन लावण्याची गरज उद्भवणार नाही", असं सूचक विधान पालकमंत्री शेख यांनी केलं.