मुंबई - हवामानाचा अचूक वेध घेण्यासाठी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र केंद्र उभारणीच्या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. अवघ्या काहीच दिवसांत मान्सून सुरू होईल, त्यामुळे ही केंद्रे कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तापमान, वाऱ्याची दिशा, वेग, सापेक्ष आद्रता, पर्जन्यमान यांची अद्यावत माहिती मिळण्यासाठी राज्य सरकारने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रामुळे पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, शेतकऱ्याला हवामान अंदाज आणि कृषी विषयक सल्ला, पिक विमा योजना आणि हवामान आधारित फळ पीक योजना अंमलबजावणी आणि मार्गदर्शनासाठी ही केंद्र उपयुक्त ठरतील, हा या मागचा उद्देश होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे सहा हजार ग्रामपंचायतीमध्ये केंद्रे उभारणीचे काम हाती घेतले. मात्र हे काम अद्याप सुरू झाले नसल्याची स्थिती आहे.