मुंबई : गोवंडी भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये यश संपादन करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करत या मुलांनी ही कामगिरी केली आहे.
गोवंडी झोपडपट्टी परिसर हा गुंडांसाठी आणि येथील अमली पदार्थांच्या व्यवसायासाठी कुप्रसिद्ध आहे. या भागातील स्थानिक डॉक्टरांची असोसिएशन स्थापन केलेल्या डॉ. जाहिद खान यांनी सांगितले, की या परिसराच्या बदनामीमुळे कित्येक डॉक्टर इथे काम करण्यास नकार देतात. यामुळेच या भागातील सहा विद्यार्थी आता डॉक्टर होणार आहेत, हे नक्कीच आशादायक आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रतिकूल परिस्थितीतूनही पास झाले 'नीट' परिक्षा! गरीबांना उपचारांसाठीच्या अडचणी पाहिल्या..
सैफ जोगळे या विद्यार्थ्याने ७२० पैकी ५९१ मार्क मिळवत यश संपादन केले. सैफचे वडील केटरिंगचा व्यवसाय करतात. लहानपणापासून आपण आपल्या पालकांना आणि इतर गरीब लोकांना चांगल्या उपचारांसाठी सहन कराव्या लागणाऱ्या अडचणी पाहिल्या आहेत, यातूनच आपण डॉक्टर होण्याचा निश्चय केला असे सैफने सांगितले.
कोरोना काळातील अडचणी पाहून मिळाली प्रेरणा..
जैबा खान या विद्यार्थिनीने सांगितले, की कोरोना काळात दिसत असलेली डॉक्टरांची कमतरता पाहून आपल्याला अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. लहानपणापासूनच आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचे होते असेही जैबाने सांगितले.