मुंबई -अरबी समुद्रात निर्माण झालेले तौक्ते चक्रीवादळ आता संथपणे गुजरातच्या दिशेने सरकत आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे एकूण ६ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. आज (१७ मे) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे घरांचेदेकील नुकसान झाले आहे. तर रायगडमध्ये या चक्रीवादळाने तीन जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असून, मदतकार्य वेगाने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्माळून पडली आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने, तसेच रेल्वे मार्गावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० वाजल्यानंतर वरळी- वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मुंबई विमानतळावरील सर्व विमानांची उड्डाने रात्री 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे मुंबईतील ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.
वादळी वाऱयासह पाऊस आणि त्यात दुपारी ३:४४ वाजता समुद्राला भरती आल्याने, समुद्र लगतच्या भागांना लाटांचा तडाखा बसला. वाऱ्याचा वेग ताशी 114 किलोमीटर इतका प्रचंड असल्याने गेट- वे ऑफ इंडिया, नरीमन पॉइंट, दादर चौपाटी, जूहू येथील समुद्र किनाऱ्यांवर प्रचंड लाटा उसळल्या. खवळलेल्या समुद्रामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळ: मुंबईत ताशी ११४ किलोमीटर वेगाने वाहिले वारे
रत्नागिरीत घरांचे नुकसान, पंचनामे सुरू