महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राणीबागेला ४ महिन्यात ६ लाख पर्यटकांची भेट, अडीच कोटींचा महसूल

बच्चे कंपनी व पर्यटकांची आवडती राणी बाग म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय कोरोना काळात बहुसंख्य वेळ बंद होते. मागील वर्षी राणी बाग सुरू करण्यात आली. मात्र, तिसरी लाट आल्याने पुन्हा राणीबाग बंद करण्यात आली. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राणी बाग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या ४ महिन्यात राणीबागेला ५ लाख ९४ हजार ३५८ पर्यटकांनी भेट दिली असून त्यामधून पालिकेला २ कोटी ३७ लाख २२ हजार ३५५ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

rani bagh of Mumbai
rani bagh of Mumbai

By

Published : Mar 17, 2022, 10:27 PM IST

मुंबई- बच्चे कंपनी व पर्यटकांची आवडती राणी बाग म्हणजेच वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय कोरोना काळात बहुसंख्य वेळ बंद होते. मागील वर्षी राणी बाग सुरू करण्यात आली. मात्र, तिसरी लाट आल्याने पुन्हा राणीबाग बंद करण्यात आली. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने राणी बाग पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या ४ महिन्यात राणीबागेला ५ लाख ९४ हजार ३५८ पर्यटकांनी भेट दिली असून त्यामधून पालिकेला २ कोटी ३७ लाख २२ हजार ३५५ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

राणी बाग पर्यटकांसाठी खुली -पक्षी, प्राणी, पेंग्विन, झाडे पाहण्यासाठी पर्यटक आणि विशेषकरून लहान मुले भेट देतात. २०१७ मध्ये पेंग्विन आल्यावर राणीबागेतील पर्यटकांची गर्दी वाढली होती. पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच मार्च, २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्यामुळे पालिकेने राणीबाग बंद केली होती. कोरोणाचा प्रसार कमी झाल्यावर राणी बाग सुरू करण्यात आली. त्यानंतर डिसेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट आली. मुंबईतील शाळा ४ जानेवारीपासून बंद करण्यात आल्या. तर भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी १० जानेवारीपासून बंद करण्यात आले. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून राणी बाग पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

४ महिन्यात ६ लाख पर्यटक -राणीबागेला १ नोव्हेंबर, २०२१ ते १० मार्चपर्यंत तब्बल ५ लाख ९४ हजार ३५८ पर्यटकांनी भेट दिली. या भेटीत पर्यटकांनी वाघ ( Tiger ), पेंग्विन ( Penguin ), बिबट्या ( Leopard ), हरणांची मस्ती अनुभवली. राणी बागेत रोज ६ ते ७ हजार पर्यटक भेट देत असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचत आहे. २८ फेब्रुवारी (रविवार) २१ हजार ४८२ पर्यटकांनी भेट दिली त्यादिवशी ७ लाख ४५ हजार ३७५ रुपये महसूल मिळाला तर ६ मार्चला २१ हजार २६८ पर्यटकांनी भेट दिली त्यादिवशी ७ लाख ७७ हजार ६०० रुपये महसूल मिळाला आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता एक तिकिट खिडकी वाढवण्यात आली असून तिकिट खिडक्यांची संख्या ४ करण्यात आली असल्याची माहिती विरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

हे पाहता येते -सात प्रकारचे पक्षी उद्यान, प्राणी संग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन वाघ, बिबट्या, तरस, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६ हजार ६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.

हेही वाचा -कचऱ्याच्या बदल्यात झोपडपट्टीतील नागरिकांना पैसे, पालिकेची 'ही' आहे नवीन योजना

ABOUT THE AUTHOR

...view details