मुंबई -मुंबई महापालिकेच्या आर्थिक खर्चाच्या कामांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागते. मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेल्या सहा महिन्यात स्थायी समितीची बैठक झाली नव्हती. या सहा महिन्यातील तब्बल सहाशे प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. एकाच बैठकीत इतके प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याने भाजपाने त्याला विरोध केला आहे. हे प्रस्ताव मलईदार असल्यानेच एकदम मंजुरीसाठी आणल्याचा आरोप भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. यादरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मुंबई महानगर पालिकेच्या समित्या आणि सभागृहाच्या बैठक झालेल्या नाहीत. गेले सहा महिने पालिका आयुक्त आपल्या अधिकारात सर्व प्रस्ताव मंजूर करत आहेत. मात्र, मोठ्या खर्चाच्या प्रस्तावांना पालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यकता असते. असे प्रस्ताव पालिका प्रशासनाने आता एकत्र मंजुरीसाठी आणले आहेत. येत्या स्थायी समितीच्या बैठकीत असे तब्बल ६०० प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहेत.