मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889, 1 नोव्हेंबरला 809, 5 नोव्हेंबरला 802 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज 6 नोव्हेंबरला त्यात आणखी घट होऊन 661 नवे रुग्ण आढळून आले तर 10 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
14,714 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 661 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 16 हजार 762 वर पोहचला आहे. तर आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 372 वर पोहचला आहे. आज 896 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 58 हजार 045 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 31 लाख 75 हजार 053 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.47 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 880 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 14 हजार 714 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.