मुंबई - आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले 13 वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत असलेल्या विलंबाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा अशी आग्रही मागणी भाजपा आमदारांनी विधानसभेत आज केली.
बेस्टची थकबाकी ठेवणाऱ्या बिल्डरची एसआयटी चौकशी करा, भाजपची विधानसभेत मागणी
आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाची बिल्डरकडे गेले 13 वर्षे असलेल्या थकबाकी आणि त्यात होत असलेल्या विलंबाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करा अशी आग्रही मागणी भाजपा आमदारांनी विधानसभेत आज केली.
बेस्ट उपक्रमाच्या डेपोंंचा व्यावसायिक वापर करण्यासाठी विकासकांना देण्यात आले. यावेळी झालेल्या करारानुसार बेस्टला देय असलेल्या रकमेपैकी 320 कोटी बिल्डरकडे थकित असल्याचे तारांकित प्रश्नाव्दारे निदर्शनास आणून याबाबत काय कार्यवाही करणार, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, बेस्टचे 160 कोटी थकित असून याबाबत लवादाकडे हा विषय प्रलंबित आहे.
मात्र मंत्र्यांच्या उत्तराला जोरदार हरकती घेऊन भाजप आमदार अॅड आशिष शेलार यांनी ही बाब गंभीर असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विकासकांना देण्यात आलेल्या जागा त्यांचा त्यांना त्यावेळी मिळालेला एफएसआय, टिडीआर, कमर्शियल युटीलायझेशन आणि त्यानंतर शासनाचे नियम बदलल्यानंतर अधिकचा होणारा विकासकांना फायदा याबाबत विचार करण्यात आला आहे का? या प्रकरणात अधिकचे फायदे घेऊन सुध्दा विकासक जर बेस्टचे पैसे थकित ठेवत असतील तर हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. हे प्रकरण लवादाकडे असल्याचे सांगत मंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी चौकशी नाकारली.