मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम उपनगरातील सुप्रसिद्ध अंधेरीचा राजाचे आगमन व विसर्जनही यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय आझाद नगर उत्सव समितीने घेतला आहे. दरवर्षी 8 फुटांची गणेशाची मूर्ती असते, मात्र यंदा गणेशाची मूर्ती ही 4 फुटांची ठेवण्यात आली आहे. तर यंदा अंधेरीचा राजा गणपती स्वर्गातील देखाव्यात विराजमान होणार आहे.
दरवर्षी मोठया प्रमाणात बॉलिवूड सेलिब्रिटी व लाखो भाविक अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच अंधेरीच्या राजाची आगमन व विसर्जन मिरवणूक निघणार नाही, अशी माहिती मंडळाचे प्रवक्ते उदय सालीयन यांनी दिली.