मुंबई- राज्यात कोरोनाचा प्रसार भयंकर वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा नागरिकांची मानसिक स्थिती बिघडतांना दिसत आहे. मागील १५ महिन्यांपासून सतत कोरोना विषयीच्या बातम्या बघून सर्वसामान्यांची मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक झाली आहे. त्यामुळे येत्या रामनवमीला माध्यामांनी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
'1 दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात'
'मागील 15 महिने सातत्याने कोरोना विषयी बातम्या बघून सर्वसामान्यांची मानसिक स्थिती अतिशय नकारात्मक झाली, असे अनेक सर्वेक्षणात दिसून आले आहे. तसेच केवळ या नकारात्मकतेमुळे अनेक लोकांनी काहीही कारण नसताना आत्महत्या देखील केल्या आहे. त्यामुळे माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की येत्या रामनवमीला केवळ एक दिवस कोरोना सोडून बाकी सकारात्मक बातम्या दाखवाव्यात. जेणेकरून लोकांची मानसिकता बदलण्यास मदत होईल', असे ट्विट नांदगावकर यांनी केले आहे. मागील वर्षी कोरोनाने भारतात शिरकाव केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊन अनेक महिने वाढला होता. लोकांचे नैराश्य दूर व्हावे आणि मनोरंजनासाठी महाभारत, रामायण हा कार्यक्रम पुन्हा प्रदर्शित केला होता. या कार्यक्रमाने टेलिविजन क्षेत्रातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते.