मुंबई -बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणार्या प्रवेश प्रक्रियेला यंदा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षांकरिता आरटीई प्रवेशाच्या एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी दोन लाख ८२ हजार ८३ अर्ज आले आहे. यातील आतापर्यंत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी केवळ तीन दिवस उरले असताना आतापर्यंत फक्त १४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले ( Short Response In Maharashtra RTE Admission ) आहे.
८७ हजार ३०२ जागा रिक्त -बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील पालकांचे लक्ष याकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांमध्ये १,०१,९०६ जागा आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांकरिता आरटीई प्रवेशसाठी दोन लाख ८२ हजार ८३ अर्ज आले आहे. यातील आतापर्यंत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यातील केवळ १४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केला असून, अजूनही ८७ हजार ३०२ जागा रिक्त आहेत. सुट्या आल्याने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला प्रवेशांसाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी लागणार आहे.