महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक! राज्यात 50 रुग्णांच्या मागे एक नर्स, केरळमधून परिचारिका मागवण्याची नामुष्की - नर्स भरती आवश्यक

३ ते ४ रुग्णांच्यामागे एक नर्स असणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा विचार करता आजच्या घडीला नर्सेच्या एकूण मंजूर 25 हजार 274 पदापैकी 3 हजार 410 पदे रिक्त आहेत. त्यामुळे या कोरोनाच्या संकटाच्या काळात ५० रुग्णांमागे एक नर्स काम करीत आहेत. नवीन नर्सेस भरती न करता केरळमधून नर्सेस कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर आणल्या आहेत हा सावळा गोंधळ महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचा कमकुवतपणा दाखवणारा आहे.

nurse behind 50 patients in the state
राज्यात 50 रुग्णांच्या मागे एक नर्स

By

Published : Jul 20, 2020, 8:47 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसाला राज्यात 8 ते 9 हजार रूग्ण आढळत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. अशात रुगसेवेतील सर्वात महत्वाचा घटक असलेल्या परिचारिका अर्थात नर्सेसची राज्यात मोठी कमतरता निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिथे चार रुग्णांच्या मागे एक नर्स असायला हवी तिथे महाराष्ट्रात 50 रुग्णांच्या मागे एक नर्स रूग्णसेवा देत आहे. तर गेल्या कित्येक वर्षात रिक्त पदेच भरली न गेल्याने सर्व विभागात हजारो पदे रिक्त आहेत. त्यातही आता कोरोनामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर झाली असून आता नर्सेसची रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याची मागणी नर्सेस संघटनांनी उचलून धरली आहे.

कोरोनाच्या संकटाने राज्यातील आरोग्य यंत्रणा किती कमकुवत आहेत हे दाखवून दिलेच आहेत. कोरोना रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होणे असो वा डॉक्टर-नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असो या सर्वच बाबींनी आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली आहे. मुंबईत डॉक्टर-नर्सची कमतरता असल्याने सरकारला चक्क केरळातून डॉक्टर-नर्स मागवाव्या लागल्या. एकूणच गेल्या कित्येक वर्षात आरोग्याकडे सरकारचे दुर्लक्षच झाल्याने आज ही भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आता नर्सेस संघटना करत आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाचा विचार करता आजच्या घडीला नर्सेच्या एकूण मंजूर 25 हजार 274 पदापैकी 3 हजार 410 पदे रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालय विभागासह, पालिका रुग्णालय आणि इतर विभागातील ही पदे रिक्त असल्याचे संघटनाकडून सांगितले जात आहे. इंडियन नर्सिंग कौन्सिल(आयएनसी) ने निश्चित केलेले प्रमाण लक्षात घेतले तर शहरात एका रूग्णामागे तीन तर ग्रामीण भागात एका रूग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे. पण वर्षानुवर्षे ही पदेच न भरल्यामुळे ग्रामीण भाग असो वा शहरी भाग हे प्रमाण राखलेच गेलेले नाही. त्यामुळेच आज 50 रुग्णांच्या मागे एक नर्स काम करत आहे. तर कॊरोना काळात 60 रुग्णांच्या मागे एक नर्स काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. सुमन टिळेकर यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पदे भरली नाहीत आणि आता कॊरोना काळात कंत्राटी पद्धतीने पदे भरली जात आहेत. आज राज्यात 5000 हुन अधिक नर्स बेरोजगार असताना त्यांना कायमस्वरूपी घेण्याऐवजी त्यांना कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर तसेच केरळमधून नर्स मागवण्याच्या निर्णयावर डॉ. टिळेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.25 हजार रुपये पगार देत 11 महिन्यासाठी या नर्सेसला घेण्याऐवजी कायमस्वरूपी त्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकुल यांनी ही केली आहे. यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नर्सेची कमतरता असल्याने आज 3 शिफ्टमध्ये 8 ते 9 तास नर्स काम करत आहेत. त्यांच्यावर प्रचंड ताण आज आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

नर्सेस कमतरता हा विषय आहेच पण आज कोरोनाच्या काळात डॉक्टरांइतकीच महत्वाची भूमिका नर्सेस बजावत आहेत. त्या थेट रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे आज कित्येक नर्सेस कॊरोनाबाधित झाल्या आहेत. पण नर्सेस कमतरता असल्याने बरे झाल्यानंतर नर्सेसना त्वरित कामावर यावे लागत आहे. तर त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळण्यातही अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याकडेही वायकूळ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details