महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चिंताजनक! कोरोनामुळे राज्यातील 86 आयुष डॉक्टरांचा मृत्यू, 50 लाखांचा विमा देण्याची मागणी - Dr Shubha Raul News

राज्याच्या आयुष टास्क फोर्सच्या सदस्या डॉ शुभा राऊळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 86 आयुष डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 48 बीएएमएस, 22 बीएचएमएस आणि 16 युनानी डॉक्टरांचा समावेश आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 23, 2020, 7:04 PM IST

मुंबई-- सर्वसामान्यांना कोरोनाची लागण होत असताना कोरोना योद्धा म्हणून आघाडीवर लढणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. राज्याच्या आयुष टास्क फोर्सच्या माहितीनुसार राज्यात कोरोनामुळे 86 आयुष डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयुष डॉक्टरांनाही 50 लाखांचा विमा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच देशातील 99 खासगी डॉक्टरांचा कॊरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर कोरोनामुळे आयुष डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. मार्चपासून अलोपॅथी डॉक्टरांबरोबरच आयुष डॉक्टरही कोरोनाबरोबर लढत आहेत.

जिल्हा रुग्णालयासह कोव्हिड सेंटरमध्येही आयुष डॉक्टर काम करत आहेत. मुंबई आणि राज्यात सर्वाधिक खासगी दवाखाने ही आयुष डॉक्टरांचीच सुरू आहेत. त्यातही मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये हेच डॉक्टर सर्वाधिक संख्येने काम करत असल्याचा दावा आयुष डॉक्टरांकडून केला जात आहे. हे डॉक्टर थेट कोरोना रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊनही डॉक्टरांना कोरोनाची लागण होत आहे.


50 लाखांचा विमा देण्याची मागणी
राज्याच्या आयुष टास्क फोर्सच्या सदस्या डॉ. शुभा राऊळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 86 आयुष डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 48 बीएएमएस, 22 बीएचएमएस आणि 16 युनानी डॉक्टरांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात नेमक्या किती आयुष डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे, याची अंतिम आकडेवारी लवकरच येईल असेही राऊळ यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या डॉक्टरांचे वय 35 ते 55 दरम्यानचे आहे. आयुषचे डॉक्टर असो वा खासगी अॅलोपॅथीचे डॉक्टर असो हे सर्व डॉक्टर कोरोना योद्धे म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडताना ते मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारी डॉक्टरांप्रमाणे आयुष डॉक्टरांनाही 50 लाखांचा विमा लागू करावा, अशी मागणीही डॉ. राऊळ यांनी केली आहे.

वेतन तफावत दूर करण्याची मागणी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकतीच आयुष टास्क फोर्सची एक बैठक झाली. त्यात विमा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे राऊळ यांनी सांगितले आहे. तर आजच्या घडीला अलोपॅथी डॉक्टर असो वा आयुष डॉक्टर हे जीव धोक्यात घालत आहेत. अशावेळी आयुष डॉक्टर आणि एमबीबीएस डॉक्टरांच्या पगारात मोठी तफावत आहे. आयुष डॉक्टरांना मासिक 60 हजार रुपये तर एमबीबीएस डॉक्टरांना मासिक 80 हजार रुपये वेतन दिले जात आहे. ही वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details