मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबई हॉटस्पॉट झाला आहे. अशा स्थितीत मुंबई महापालिकेचे कर्मचारी कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसह मुंबई महापालिकेच्या एकूण २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना आजवर कोरोनाची लागण झाली. तर एकूण १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या एका उपायुक्ताचा तसेच एका सहाय्यक आयुक्ताचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. देशभरात २२ मार्चपासून टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. देशभरात टाळेबंदी सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका आदी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. तर मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.
रस्त्यावर राहणारे गरीब लोक, हातावर पोट असलेले कामगार, कोरोना झालेले रुग्ण, रुग्णाच्या संपर्कात असलेले संशयित रुग्ण आदींना रोज जेवणाची पाकीट पोहचवण्याचे काम पालिका कर्मचारी व अधिकारी करत आहेत. रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी औषध फवारणीचे कामही पालिका कर्मचारी करत आहेत.
या कामादरम्यान रुग्णाच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १०६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त शिरीष दिक्षित आणि सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचाही कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला ५० लाख रुपये आणि अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मृतात आरोग्य सफाई कामगारांची संख्या अधिक -
मुंबई महापालिकेकडून १० जुलैच्या आकडेवारीनुसार २ हजार १९८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १०२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर १ हजार १७० कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली. पालिकेतील १०२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात २ खाते प्रमुख, कर व संकलन विभागाचे ३, सफाई विभाग २७, आरोग्य विभाग २५, अग्निशमन विभाग ८, सुरक्षा विभाग ७, परिमंडळ १ मध्ये ५, परिमंडळ २ मध्ये ४ तर इतर विभागातील २१ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. २० जुलैला या आकडेवारीत वाढ होऊन एकूण २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण १०६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.