मुंबई- मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असून त्यात १२ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनाही मोदी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे, तर डॉ. हर्षवर्धन यांचाही आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यासोबतच स्मृती इराणी यांच्याकडील वस्त्रोद्याग, पीयूष गोयल यांच्याकडूनही रेल्वे खाते काढून घेण्यात आले आहे. यावर शिवसेनेने चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या अशी खरमरीत टिप्पणी केली आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केंद्राने सहकार मंत्रालय हे नवीन खाते निर्माण केले आहे. त्यावर शिवसेनेने हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असून 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत असल्याचे सांगत, हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे, असा केंद्राला टोला लगावला आहे.
शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेतला आहे. मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱयावर लागलेले ओंडकेच आहेत. भारतीय जनता पक्षाचा किंवा 'एनडीए'चा गाभा मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोठेच दिसत नाही, पण सरकार चालविण्याची क्षमता असलेल्या लोकांची निवड पंतप्रधानांनी पारखूनच केली असणार, असा टोला 'नवे मंत्रिमंडळ: काय करणार?' या शिर्षकांच्या अग्रलेखातून लगावला आहे.
मेणबत्त्या पेटवून, थाळ्या वाजवून कोरोना पळवा, हे निर्णय कोणी घेतले होते?
'मंत्रिमंडळ विस्तारास 'मेगा सर्जरी'ची उपमा दिली आहे. ही खरोखरच सर्जरी असती तर अर्थमंत्री व विदेश मंत्र्यांना सगळय़ात आधी घरी पाठवले गेले असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, परराष्ट्र व्यवहार नीतीचा आज जो बोजवारा उडाला आहे तो तसा याआधी कधीच उडाला नव्हता, पण पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी गुजरातचे मनसुख मांडवीय यांची नेमणूक केली. हर्षवर्धन यांच्या काळात महामारीचा उद्रेक झाला व लोकांच्या प्रेतांचे खच पडले हे खरे, पण याबाबतीत मेणबत्त्या पेटवून, थाळय़ा वाजवून कोरोना पळवा असे सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते. मनसुख मांडवीय हे तरुण व अधिक कार्यक्षम आहेत. आधीच्या जहाज बांधणी मंत्रालयात त्यांचे काम चांगले होते. ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे हा धक्काच आहे. त्या दोघांनाही धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो इतकीच प्रार्थना आपण करू शकतो.' असे म्हणत शिवसेनेने अटलबिहारी सरकारमध्येही मंत्री राहिलेल्या प्रसाद यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
'चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या'
'आधीच्या मंत्रिमंडळातील शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांना इतके महत्त्वाचे खाते जेव्हा दिले तेव्हाच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेने आवंढा गिळला होता. जे खाते पी. व्ही. नरसिंह राव, अर्जुन सिंग, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या तज्ञांनी सांभाळले होते, ते पोखरीयाल यांना देताना भान ठेवायला हवे होते. रमेश पोखरीयाल यांना 'बिग्री'च्या शिक्षण व्यवस्थेचेही ज्ञान नसताना मनुष्यबळ विकास मंत्रालयात बसवले हीच राजकीय चूक होती. आता तेथे धर्मेंद्र प्रधान यांना आणले व त्यांचे पेट्रोलियम खाते हरदीप पुरी यांना दिले. प्रधान यांच्याच काळात पेट्रोल-डिझेलच्या अनिर्बंध दरवाढीने लोकांना घाम फोडला. पेट्रोल तर शंभरी पार करून पुढे गेले. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरूनही देशात पेट्रोलचे भाव उतरले नाहीत. आता प्रधान शिक्षणात तर पुरी हे पेट्रोल खात्यात काय दिवे लावतात ते पाहायचे. पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांना दिले. श्री. गोयल यांना हा धक्काच आहे. चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या. त्या किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार आहे.' अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे.