महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पोकळ हिंद्त्वावरुन शिवसेनेची भाजपवर फटकेबाजी, सामनाच्या अग्रलेखातून डागले बाण - सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका

महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्याने जर शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित होत असतील. तर जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्त्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय, असा प्रतिप्रश्न सामनातून करण्यात आला आहे.

saamana editorial
saamana editorial

By

Published : Oct 23, 2021, 7:36 AM IST

Updated : Oct 23, 2021, 8:25 AM IST

मुंबई - शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्यानंतर महाविकास आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करत, शिवसेनेचे हिंदुत्व हे बेगडी असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दसरा मेळाव्यात बोलताना या आरोपांचा समाचार घेत, हिंदुत्त्वाला नवहिंदुपासून धोका असल्याचा खोचक टोला भाजपाला लगावला होता. यावरून पुन्हा सामानतून भाजपावर कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे. महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्याने जर शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित होत असतील. तर जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्त्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय, असा प्रतिप्रश्न सामनातून करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेने काय केले व करायला हवे त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरील हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱ्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्त्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? महाराष्ट्रात शिवसेनेने काय केले व करायला हवे त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरील हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही. एका राज्यात गोमांसावरून लोकांना ठार करायचे व दुसऱया राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची हे तुमचे बेगडी हिंदुत्व. हे तुमचे नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावरील ही फुकाची प्रवचने आता बंद करा! कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोटू नयेत, असा शाब्दिक प्रहार सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

'हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही' -

पुढे लिहीताना, 'भारतीय जनता पक्षात सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. खरे तर हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही. देशातील एकंदरीत स्थिती अशी आहे की, आज हिंदू खतऱ्यात आला आहे. हा मजकूर लिहीत असताना कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ा आणि आक्रोशाने आमचे काळीज अस्वस्थ झाले आहे. कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत व त्यांनी मोठय़ा प्रमाणावर पलायन सुरू केले आहे. नव्वदच्या दशकात कश्मीर खोऱ्यात अगदी अशीच तणावाची स्थिती होती. गेल्या पंधरा दिवसांत कश्मीर खोऱ्यातील 220 हिंदू-शीख कुटुंबांनी जम्मूतील निर्वासितांच्या छावण्यांत आश्रय घेतला आहे. हे काही (नव) हिंदुत्ववाद्यांसाठी चांगले लक्षण नाही. शिवसेनेस सध्या हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांना कश्मीरातील हिंदूंचे पलायन आणि हत्या दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते, असे अग्रलेखात म्हटले आहे.

'हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य' -

बांग्लादेशात हिंदुंवर होणाऱया हल्ल्यावरूनही भाजपावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. 'बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. हिंदूंच्या वस्त्या जाळल्या जात आहेत. हिंदू मुलींच्या इज्जतीवर हल्ले सुरू आहेत. संपूर्ण बांगलादेशात हिंदू समाज भीतीच्या सावटाखाली कसाबसा जगतो आहे. महाराष्ट्रातील बेगडी हिंदुत्ववादी जे 'शिवसेनेने हिंदुत्व सोडले हो' म्हणून कंठशोष करीत आहेत, त्यांना बांगलादेशातील हिंदूंची होत असलेली राखरांगोळी चिंतामग्र करीत नाही. कश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे, असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा - 'अविघ्न पार्क' आग प्रकरण : विकासकावर गुन्हा दाखल, अग्नी सुरक्षिततेबाबत ठोस धोरण करणार

Last Updated : Oct 23, 2021, 8:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details