मुंबई - शनिवारी काश्मीरच्या हंदवाडा क्षेत्रात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल शर्मा यांच्यासह पाच जवान हुतात्मा झाले. या जवानांवर काल अंत्यसंस्कार करणार आले. या पार्श्वभूमीवर सामना संपादकीयतून कोरोनाशी लढताना आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चालले आहे, याकडे कानाडोळा केल्याचे म्हटले आहे. तसेच, ज्याप्रमाणे देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस हे कोरोना योद्धे आहेत, असे सांगत पंतप्रधान मोदींनी या कोरोना योद्ध्यांवर फुले बरसण्यासाठी सैन्याच्या तिन्ही दलांना मैदानात आणि आकाशात उतरवले. तसेच 'या सर्व शहिदांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा हो, त्यांना मानवंदना देण्यासाठीही बॅण्ड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा. या पाच जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठीही एखादा सर्जिकल स्ट्राइक गाजावाजा न करता होऊ द्या' असे म्हटले आहे.
प्रत्यक्ष युद्धभूमीवर कानाडोळा झाला...
सारा देश कोरोनाशी युद्ध लढत आहे व हे युद्ध आणखी किती काळ चालेल ते सांगता येत नाही. या गडबडीत प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय चालले आहे? त्याकडे आपला कानाडोळा झाला आहे. हा कानाडोळा शनिवारी बहुधा सैल झाला असावा. कश्मीरच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती आणि हल्ले वाढले आहेत. उत्तर कश्मीरमधील हंदवाडा क्षेत्रात शनिवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली त्यात हिंदुस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह पाच जवानांचे बलिदान झाले असून हा सर्व प्रकार धक्कादायक आहे, असे सामनातून सांगण्यात आले आहे.
देशात जे हिंदू-मुसलमान असा राजकीय खेळ करत आहेत, त्यांनी काझींचे बलिदान विसरु नये...
कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावणार्या कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी आपल्या लढाऊ विमानांनी, हेलिकॉप्टर्सनी आकाशातून या ‘कोरोना योद्ध्यां’वर पुष्पवृष्टी केली. काही ठिकाणी लष्कराच्या बॅण्ड पथकानेही मानवंदना दिली. पायदळ व नौदलानेही या मानवंदना सोहोळ्यात भाग घेतला. पण त्याचवेळी कश्मीरात पाकड्या अतिरेक्यांबरोबर चकमक सुरू होती. यात कर्नल आशुतोष शर्मा व त्यांचे चार सहकारी हुतात्मा झाले. या पाचही वीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे. त्यातील एका वीराचे नाव सबइन्स्पेक्टर एस. ए. काझी असे आहे. सध्या देशात जे हिंदू-मुसलमान असा राजकीय खेळ करीत आहेत त्यांनी कर्नल शर्मा यांच्या खांद्यास खांदा लावून पाकड्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या काझी यांचे बलिदान विसरू नये, असे सामनातून सुनावण्यात आले आहे.
हेही वाचा...टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा, मे अखेरपर्यंत राज्य ग्रीन झोनमध्ये हवे - मुख्यमंत्री ठाकरे
काश्मीरातील शांतता म्हणजे भूगर्भातली खदखद...