मुंबई -भारतीय नौदलाची शान आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताला निर्णायक विजय मिळवून देणारी आयएनएस विक्रांत (INS Vikrant) ही विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाली. नंतर या युद्धनौकांचे वस्तुसंग्रहालय करण्यासाठी करोडो रुपयांचा मदतनिधीचा भ्रष्टाचार भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी केल्याचा आरोप शिवसेनेने (Shivsena) केला आहे. या संदर्भात दक्षिण मुंबईतील शिवसैनिकांनी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वात आज लायन गेट समोर आंदोलन (Shivsena Protest) केले.
मुंबईत ६११ ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी डब्बे - १९७१ च्या युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर युद्ध स्मारक बनवण्याच्या नावाखाली ५८ कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोमैया यांनी जमा केलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द करणे अपेक्षित होते. मात्र, हे पैसे मिळाले नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात लेखी स्वरूपात प्राप्त झाल्याने हा विषय गंभीर बनला आहे. यासाठी आता मुंबईभर शिवसैनिकांनी किरीट सोमैया यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे.