महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भागवत यांच्यानंतर शिवसेनेने आळवला राम राग, म्हणाले- रामाचे काम होणारच - ram

देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटयवधी जनतेने मोदी यांना भरभरून मते दिली. ही सर्व प्रभू श्रीरामाचीच कृपा.

भागवत यांच्यानंतर शिवसेनेने आळवला 'रामराग' म्हणाले रामाचे काम होणारच

By

Published : May 29, 2019, 8:26 AM IST

मुंबई - देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच भाजप प्रणित एनडीएला मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कौल दिला. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात प्रभू रामचंद्राचे काम करायचे आहे आणि रामरायाचे काम होणारच असे वचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामाना'तून यावर भाष्य करण्यात आले आहे.

देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटय़वधी जनतेने मोदी यांना भरभरून मते दिली. ही सर्व प्रभू श्रीरामाचीच कृपा. अयोध्येत राममंदिर व्हावे व त्यासाठी प्रयत्न करावेत हा काही अपराध नाही. राम ही देशाची ओळख आणि अस्मिता आहे. अयोध्येत राममंदिर निर्माण व्हावे यासाठी शेकडो कारसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे हौतात्म्य आणि रक्त वाया जाऊ देणार नाही, अशा विचाराचे सरकार लोकांनी निवडून दिल्यावर रामाचे काम होणारच, असा विश्वास या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशामध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराविषयी सूचक वक्तव्य केले आहे. उदयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चार दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

रामाचे काम करायचे आहे आणि रामाचे काम होणारच. यावर लक्षही ठेवले जाईल, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. मोहन भागवत यांच्या वक्तव्यात राम मंदिराचा उल्लेख नसला तरीही त्यांचा रोख त्या दिशेनेच असल्याचा कयास बांधला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीही आरएसएसने राम मंदिरासंबंधी भाजप सरकारप्रती नाराजी व्यक्त केली होती. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी, असे स्पष्ट केले होते. याच मुद्याचा धागा पकडून सामनामधून शिवसेनेने रामाचे काम होणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details