मुंबई -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर आरोपाची सरबत्ती केली. यानंतर शिवसेनेकडून सिंधुदुर्गातील सात राजकीय हत्यांचे प्रकरण उकरून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आम्ही भेट घेणार आहोत, अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच किरीट सोमैयांनी राणेंवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेच्या या नारायणअस्त्रामुळे राणेंची कोंडी होण्याची शक्यता आहे.
- मुलांच्या उपद्वापामुळे नारायण राणेंना स्मरणात राहत नाही - विनायक राऊत
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन प्रकरण आणि शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचा इशारा दिला. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यानंतर पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी अवस्था झालेली दिसते. भाजपच्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी केविलवाणी परिस्थिती राणेंची आहे. स्वार्थासाठी लाचारी पत्करत आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच राणेंचे आरोप निराधार असून वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल, मुलांच्या उपद्वापामुळे स्मरणात राहत नसेल तर त्यांचा भूतकाळ त्यांना सांगावा लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला. तसेच गेल्या नऊ वर्षात अनेक राजकीय हत्या झाल्या. खंडण्या उकळणे गेल्या, मंचेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घुणपणे खून कोणी केला? हे कोणी पचवले? श्रीधर नाईकच्या खुनातील आरोपी कोण होते? हे आम्हाला उघड करा लावू नका, असे राऊत म्हणाले. या सर्व राजकीय हत्यांची चौकशी व्हावी, याकरिता उद्या राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
एक केंद्रीय मंत्री ईडीची धमकी देऊन पदाचा दुरूपयोग करत आहेत. ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरल्याशिवाय कोणी धमकी देऊ शकत नाही. आधीच ईडीचा राज्यात उपद्व्याप सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्र्यांकडून ईडीसारख्या स्वायत्त संस्थेची बदनामी करणे गंभीर आहे. संसदेत याबाबत आवाज उठवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास बाब आणून देणार असल्याचे राऊत म्हणाले.
- दिशा सालियन प्रकरणावरून राजकारण -
नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून शिवसेनेला टार्गेट केले. शिवसेनेच्या कारणाची कुंडली बाहेर काढण्याचा इशारा राणेंनी दिला होता. विनायक राऊत यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमैया यांनी नारायण राणेंवर विविध आरोप केले होते. त्याचे तीन व्हिडिओ दाखवण्यात आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधान परिषदेत राणेंची कुंडली काढली होती. सिधुदुर्गातील काही खुनाबद्दल केलेल्या विधानाचा दाखला देत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले. नारायण राणे यांच्या विरोधातील सर्व प्रकरणे आता बाहेर काढणार असल्याचा इशारा विनायक राऊत यांनी यावेळी दिला.
- दिशा सालियनवरून किशोरी पेडणेकर यांची टीका -
भाजप आघाडीची बदनाम करत आहे. तर किरीट सोमैयांच्या माध्यमातून तीन पैशाचा तमाशा माध्यमातून मुंबईत सुरू आहे. दिशा सालियनबद्दल काढलेले उद्गार व्यथित करणारे आणि तिच्या रिपोर्ट दाखव ठरवणारे आहेत. शिवाय तिच्या चारित्र्याचे हणन होत आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत होती त्याचे काय झालं? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिची बदनामी करणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबत कठोर कारवाई करावी, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी एक महिला म्हणून या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती महापौरांनी केली.