मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथे सभा ( Cm Uddhav Thackeray Rally ) घेणार आहेत. ही सभा म्हणजे बुस्टर नसून, मास्टर ब्लास्टर डोस असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला ( Mp Sanjay Raut Slams Bjp ) आहे. आमची फटकेबाजी असते कारण आम्ही मास्टर-ब्लास्टर आहोत, असा चिमटाही त्यांनी काढला. जवळपास दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. त्यानंतर होणारी ही सर्वात मोठी शिवसेनेची सभा असणार आहे. मुंबईत होणार्या शिवसेनेच्या सभांची परंपराही अतिविराट आहे. सभेसाठी शिवसेनेला गर्दी जमवावी लागत नाही. या सभेतून विरोधकांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल, असा चिमटाही संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना काढला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मैदानात उतरण्याच्या जिद्दीने सभेचे आयोजन -संजय राऊत म्हणाले की, आजच्या होणाऱ्या सभेसाठी आतापर्यंत कधीही मुंबईत कोणत्याच सभेत नसेल, असे भव्य व्यासपीठ या सभेसाठी तयार करण्यात आले आहे. विरोधकांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या जिद्दीने आजची सभा होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अशा सभेची वाट लाखो शिवसैनिक पाहत आहेत. आजच्या सभेनंतर राज्यात आलेले धुकं आणि गढूळपणा निघून जाईल आणि महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल. काही लोक राज्य पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांची पोटदुखी आहे. त्यावर आजच्या सभेत उद्धव ठाकरे उपचार करतील, असा इशाराही संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
पवारांवर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे यांनी वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊतांनी म्हटले की, अश्या लोकांकडे दुर्लक्ष करा. काही लोक हिमालयासारखी मोठी असतात. सूर्यावर थुंकले तर त्याचं महत्त्व कमी होत नाही, अशी पोस्ट करणारी लोक नशेबाज आहेत. एक वेगळ्याप्रकारची नशा यांच्या डोक्यात कोणीतरी घातली आहे. ही लोकं शूद्र कीटक आहेत, असा टोला शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला लगावला आहे.