मुंबई-मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांना आणि विशेषत: कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाकडून 16ऑगस्टपासून देशभरात 'जन आशीर्वाद' यात्रा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका असतानाही भाजपाकडून ही जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या या यात्रेवरती टीका केली आहे. कोव्हिड काळात वर्क फ्राॅम होम ही काळाची गरज आहे. मात्र तुम्ही ऊकीरडे फुंकत फिरत आहात, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेवर केली आहे.
राऊत म्हणाले, जन आशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. या काळात जन आशीर्वाद यात्रेची काहीच गरज नसताना, भाजपाकडून ही यात्रा काढली जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट वाढणार आहे. भाजपाचे मंत्री ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही, तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन करत राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव घेता या यात्रेवरून निशाणा साधला आहे.
भाजपाचा एकही मुख्यमंत्री टॉपमध्ये नाही-
टॉप फाईव्ह मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आले आहे, ही मोठी बाब आहे. महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केले, यावर विरोधकांनी यापूर्वी अनेकदा गाजावाजा केला, ढोल बडवले. मुख्यमंत्री काम करत नाहीत, घरी बसतात, अशी टीका केली, पण मुख्यमंत्र्यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाची संपूर्ण जगाने देशाने नोंद घेतली आहे. जो पोल आहे तो एका प्रतिष्ठित संस्थेचा पोल आहे आणि त्यांनी दिलेल्या या पोलमध्ये भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचा नाव नाही असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.
कितीही ढोल बडवा, त्याचा काहीही उपयोग नाही