महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते'

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी दिवाळीची महती सांगताना केंद्र सरकार व अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य केले आहे. रामायणातील काही प्रसंगांचे दाखले देताना राऊत यांनी रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही, असा टोला लगावला आहे. तर, 'तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते', असे म्हणत अर्णब गोस्वामींवर निशाणा साधला आहे.

शिवसेना मुखपत्र सामना न्यूज
शिवसेना मुखपत्र सामना न्यूज

By

Published : Nov 15, 2020, 2:55 PM IST

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'तील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी दिवाळीची महती सांगताना केंद्र सरकार व अर्णब गोस्वामी यांना टोला लगावला आहे. यासाठी संजय राऊत यांनी रामायणातील काही प्रसंगांचे दाखले दिले आहेत. त्यांनी केंद्र सरकारवर राम मंदिराचं भूमिपूजन आणि अर्णब गोस्वामींवर वनवासाचे उदाहरण देत निशाणा साधला आहे.

कोरोनावरून केंद्र सरकारवर निशाणा

'प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदाचा उत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे दिवाळी. आता अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन झालं आहे. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच ‘जय श्रीराम’चे नारे दिले, पण रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही,' असे सांगत राऊत यांनी कोरोनाशी लढण्यात केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. पुढे राऊत यांनी 'तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते', असे म्हणत अर्णब गोस्वामींना लक्ष्य केले आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्री साहेब पैसं बँकेत टाका की; चिमुकलीच्या भावनिक पत्रानंतर पोलिसांनी तिची दिवाळी केली गोड

ज्ञान, बुद्धी, विचार कमवावे लागतात

'ज्ञान, बुद्धी, विचार कमवावे लागतात. हे कमवणे आता कमी झाले आहे. एका वृत्तवाहिनीचा प्रमुख गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्याबद्दल तुरुंगात गेला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो सुटून तुरुंगातून बाहेर पडला. तेव्हा ‘भारतमाता की जय’ वगैरे घोषणा देऊ लागला. येथे भारतमातेचा काय संबंध? ज्या न्यायमूर्ती महाशयांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या सबबीखाली त्याची सुटका केली, त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देणे हे समजण्यासारखे आहे. येथे भारतमाता, राष्ट्रभक्ती वगैरेचा संबंध काय?,' असा प्रश्न करत राऊत यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणी केंद्र सरकारसह न्यायव्यवस्थेवरही निशाणा साधला आहे.

'चला, जशी आली आहे, तशीच दिवाळी साजरी करूया!

'ज्या तरुण उद्योजकाने छळास कंटाळून आत्महत्या केली, ते अन्वय नाईक यांचीही भारतमाता होतीच आणि त्यांच्या पत्नीचीही भारतमाता आहे. भारतमातेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा उत्सव फक्त एका व्यक्तीपुरता नसतो,' असे राऊत यांनी म्हटलं आहे.

'दिवाळी म्हणजे तेजपर्वाची सुरुवात. श्रीरामाच्या वनवास समाप्तीने, अयोध्येतील आगमनाने या पर्वाची सुरुवात झाली. देश आज अंधारलेला आहे. नवे तेजपर्व सुरू होईल,' अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत आहे,' असे म्हणतानाच राऊत यांनी शेवटी 'चला, जशी आली आहे, तशीच दिवाळी साजरी करूया!' असेही म्हटले आहे.

हेही वाचा -दिवाळी निमित्त भिमाशंकर मंदिरात विद्युत रोषणाई; शिवलिंगाला फुलांचा शृंगार

ABOUT THE AUTHOR

...view details