मुंबई -पत्राचाळ प्रकरणी ( patra chawl case ) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर राऊत कुटुंबीयांवर एक मोठा आघात झाला आहे. वर्षा राऊत यांच्यासोबत संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत, संजय राऊत यांची मोठी कन्या आणि जावाई हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पत्राचाळमध्ये जे 9 कंत्राटदार होते, त्यांची चौकशी का केली जात नाही. त्यामध्ये मोहित कंबोज सुद्धा आहे. परंतु, त्यांची चौकशी होणार नाही, कारण ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप सुनील राऊत यांनी केला ( shivsena mla sunil raut allegation mohit kamboj ) आहे.
'संजय राऊत यांना अटकवणे हेच लक्ष' - सुनील राऊत म्हणाले की, ईडी कोणाच्या तरी दबावाखाली हे सर्व करत आहे. जी जमीन घेतली आहे, ती रेडी रेकनरच्या दरानुसार घेतली आहे. रेडी रेकनरच्या सुद्धा जास्त भावाने जमीन घेतली आहे. तिथे कुठेही रोखीचा व्यवहार झाला नाही. या लोकांना जबरजस्ती १० तास बसवायचं व त्यांना भीती दाखवायची व त्यांच्याकडून हे सर्व लिहून घ्यायचं. त्यांचे उद्दिष्ट एकच आहे कुठल्याही परिस्थितीत संजय राऊत यांना अटकवायचे आहे, असा आरोप सुनील राऊत यांनी ईडीवर केला आहे.
'भाजपला सरेंडर होणे हीच क्लीनचीट' - निरव मोदी असतील नारायण राणे, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक यांना सुद्धा ईडीच्या नोटीस आल्या होत्या. परंतु, ते भारतीय जनता पार्टीत गेले. जर संजय राऊत भाजपला सरेंडर झाले असते तर त्यांच्यावरही आरोप लागले नसते. भाजपला सरेंडर होणे हीच क्लीनचीट आहे. आम्ही, संजय राऊत भाजपला सरेंडर झाले नाहीत म्हणून ही चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांना सुद्धा दबाव येत होते. परंतु, त्यांनी आयुष्यातली ३० ते ३२ वर्ष बाळासाहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांची निष्ठा त्यांच्यासोबत आहे, ते कधी सरेंडर होणार नाहीत, असेही सुनील राऊत म्हणाले.
'कंत्राटदारमध्ये मोहित कंबोजचा समावेश' -हे सर्व एका गनिमीकाव्याने सर्वांना घेरण्याचे प्रयत्न आहेत. हे ४० बंडखोर आमदार असेच गेले का? यांच्यावर दबाव तंत्र तयार केले. या भाजपला देशात प्रादेशिक पक्ष ठेवायचे नाहीत. याची सुरुवात त्यांनी शिवसेनेपासून केली आहे. शिवसेना ही कुठल्या नेत्यावर चालत नाही तर ती शिवसैनिकांवर चालते, म्हणून शिवसेना मजबूत आहे. शिवसैनिक मजबूत आहे. म्हणून शिवसेनेला महाराष्ट्रात काही धोका नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी पुन्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून बसतील ही खात्री आहे. महाराष्ट्रात, देशात शिवसेनेबद्दल एक सिंपथी तयार झाली आहे. जी काही कारवाई चालू आहे ती फक्त विरोधी पक्ष नेत्यांवर चालू आहे. पत्राचाळीमध्ये जे ९ कंत्राटदार होते, त्यांची चौकशी का केली जात नाही. त्यामध्ये मोहित कंबोज सुद्धा आहेत. परंतु, यांची चौकशी पत्रा चाळ प्रकरणी होणार नाही. कारण ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा घणाघाती आरोपही सुनील राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा -Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची 'नंदनवन'वरती मुख्यमंत्र्यांशी भेट; म्हणाले, 'कितीही युक्तीवाद केला तरी...'