मुंबई -विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज ( 3 जुलै ) पार पडली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली. त्यावेळी विरोधी आणि सत्ताधारी पक्ष दोघांत एकमेकांना चिमटे काढण्यात आले. अडीच वर्षे आधीच देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या कानात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असं सांगितलं, असतं तर आज ही परिस्थिती आली नसती. उलट आज ही परिस्थिती बदललेली असते, असा चिमटा आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला ( Aaditya Thackeray Taunt Devendra Fadnavis ) आहे.
बंडखोर आमदारांकडे आदित्य ठाकरेंचे दुर्लक्ष - सभागृह सुरू होण्याआधी सभागृहात भाजपचे आमदार फेटे बांधून आले. त्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेसचे आमदार सभागृहात आले आणि सर्वात शेवटी शिवसेनेचे आमदार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत प्रवेश केला. सभागृहात प्रवेश केल्यानंतर तिथे असलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळीला आदित्य ठाकरे यांनी नमस्कार केला. मात्र, बंडखोर आमदारांकडे त्यांनी पाहिलं नाही. तसेच, समोरच्या बाकावर बसलेल्या बंडखोर आमदार थेट न पाहता आदित्य ठाकरेंकडे छुप्या नजरेने निहाळतांना पाहायला मिळाले.