मुंबई- पुण्यातील कोविड सेंटर चहावाल्याला चालवायला दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला. शिवसेना नेत्यांनी यावरून सोमैय्यांवर लक्ष्य करताना, चहावाल्याची लायकी नाही? अस म्हणायचे आहे का? चहा विक्री करणाऱ्या पंतप्रधानांना देश चालवायला देणे चूक आहे का? असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
पुण्यातील कोविड सेंटरचे काम एका चहावाल्याला देऊन कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी पुण्यात केला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोमैय्यांनी यावेळी उंगली निर्देश केले. यावरून शिवसेना नेत्यांनी भाजप नेते किरीट सोमैय्यांचा समाचार घेतला. शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे ( Shivsena spokesperson Kishor Kanhere ) म्हणाले, की कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. जगभरात याचे कौतुक होत आहे. न्यायालयानेही महाराष्ट्र सरकारचे गोडवे गायले आहेत. भाजप नेत्यांना हे खटकत असून त्यांच्या पोटात जळजळ आणि मळमळ व्हायला लागली आहे. या नेत्यांसाठी वेगळे सेंटर उभारून त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, असे मत शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी व्यक्त केले. चहावाल्याची चौकशीची मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील चहा विकला का ? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली.
सोमैय्या यांनी पुण्यात घातलेला गोंधळ हास्यास्पद आणि दयनीय -मनीषा कायंदे
कोविड सेंटरवरून वादळ निर्माण करण्याचा सोमैय्या यांचा प्रयत्न आहे. मात्र ते इथेही तोंडघशी पडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात पारदर्शक पद्धतीने काम केले. जगाने कामाची दखल घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे पारदर्शक काम भाजपला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे खोटेनाटे आरोप केले जात आहेत. भाजपच्या सगळ्या नेत्यांना जळजळ व मळमळ बरोबरच आता मानसिक आजार जडला आहे. त्यावर इलाज करण्याची गरज असल्याचे शिवसेना आमदार तथा प्रवक्त्या मनीषा कायंदे ( Shivsena leader Manisha Kayande ) यांनी म्हटले आहे. चहावाल्याने कंत्राट घेतला की नाही हे तपासत येईल. परंतु, चहा विक्रीचा धंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केला आहे. त्यामुळे अन्य कोणी करू नये का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपला कोणीही मनावर घेत नाही. त्यामुळे सोमैय्या यांनी पुण्यात घातलेला गोंधळ हास्यास्पद आणि दयनीय आहे, असेही त्या म्हणाल्या.