मुंबई- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सिडकोच्या विविध कामात अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका 'कॅग'कडून ठेवण्यात आला आहे. हा घोटाळा अतिशय गंभीर असून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅगच्या अहवालावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या अहवालात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुमारे अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या काही कामात आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा प्रसिद्ध न करताच कामे देणे, किमान निविदा रकमेच्या कामांचा अनुभव नसताना काही कंत्राटदारांना कामे मंजूर करणे यांसारखे प्रकार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ‘सिडको’मध्ये झाले असल्याचे कॅगमध्ये नमूद करण्यात आले आहे. एकीकडे हा अहवाल अद्याप सभागृहात ठेवण्यात आला नाही. सध्या राज्यपालांच्या परवानगीसाठी हा अहवाल पाठवण्यात आला असून त्यांच्या परवानगीनंतर सभागृहात मांडला जाणार आहे. यामुळे विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कोंडी होण्याची दाट चिन्ह आहेत.