मुंबई- शिवसेना विरुद्ध नारायण राणे काही वाद नवीन नाही आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दरम्यान देखील त्यांच्यात खटके उडताना दिसत आहे. नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवसैनिकाने या भागाचे शुद्धीकरण केल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाला. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता, त्यांनी देखील कोण नारायण राणे? याबाबत मला माहिती नाही, याबाबत आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार बोलतील, असे म्हणत खोचक टोला लगावला. हा स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दात राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर भाष्य केल आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. या यात्रेपूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे गोमुत्र टाकून शुद्धीकरण केले. त्यानंतर आज संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, माध्यमांना त्यांनी नारायण राणे यांना ओळखत नसल्याचे सांगत यावर शाखाप्रमुख उत्तर देतील अशी खोचक प्रतिक्रिया दिली.