मुंबई -राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच सुटल्याचे दिसत नाही. अशातच संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच शिवसेनेसोबत चर्चा न करता 'एनडीए'तून शिवसेनेला बाहेर काढणे, ही भाजपच्या अंताची सुरुवात असून ती महाराष्ट्रातूनच सुरू होणार असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.
हेही वाचा.... पवारांचा यू टर्न..? आता म्हणतात ५४ आमदारांवर सरकार कसे बनवणार, सेनेची कोंडी
सत्ता स्थापनेबाबत अधिक वेळ लागत असल्याबाबत काही पत्रकारांनी राऊतांना विचारले, यावर बोलताना राऊत यांनी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल, असा निर्वाळा दिला. तसेच यापूर्वीही सरकार स्थापनेसाठी यापेक्षाही अधिक वेळ लागल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नसल्याचेही राऊत म्हणाले.
हेही वाचा... शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार
2014 लाच आम्हाला युतीत पुन्हा जाण्याची इच्छा नव्हती
2014 मध्ये युती तुटल्यानंतर खरेतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. मात्र, अमित शाह मातोश्रीवर आले आणि त्यांनी आम्हाला राज्यात आणि केंद्रात युती करण्याची इच्छा बोलून दाखवली. आम्ही तेव्हा युतीत गेलो नसतो, तर राज्याचे चित्र काही वेगळे असते, असे राऊत म्हणाले. तसेच आताही भाजपने त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. येत्या काळात भाजपला त्याची किंमत चुकवावी लागेल आणि भाजपच्या अंताची सुरुवात ही महाराष्ट्रातूनच होईल, असे वक्तव्य त्यांनी केले.
हेही वाचा... चंद्रकांत पाटील हे दिल्लीहून लादलेले उमेदवार होते - संजय काकडे
सामनातील भूमिका योग्यच - राऊत
सामनातील संपादकीय मधील आजची भूमिका योग्य असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही संपादकीयमधून सत्य मांडले. महाराष्ट्रात भाजपला उभे करण्याचे काम शिवसेनेने केले. मात्र, आम्हाला कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता एनडीएतून बाहेर काढले. याबाबत आम्ही तसा सवाल सामनाच्या संपादकीयमधून केला आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा केली आहे. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे, असा घाणाघात सामनातून करण्यात आला आहे.