मुंबई - जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. तहसील कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या (Rahul Bhat Murder) अधिकाऱ्याला ठार केले. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानवर बोट दाखवू नका - काश्मीर पंडित यांची हत्या ( Kashmiri Pandit in Kashmir ) करण्यात आली हे फार दुर्दैवी आहे. काश्मीरमध्ये हे पुन्हा सुरू झालेले आहे. याच्यामागे काय षडयंत्र आहे? हे तपासले पाहिजे. वारंवार काश्मीर आणि पाकिस्तानवर बोट दाखवू नका. आम्ही काश्मिरी पंडितांसाठी काय करतोय? हा महत्त्वाचा विषय आहे. असे सांगत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ठणकावले आहे. कलम 370 काढल्यावर सुद्धा काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित सुरक्षित नाही, तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
गृहमंत्री व पंतप्रधानांनी विचार करावा -पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकांचे राजकारण बाजूला सारून यावर लक्ष द्यायला पाहिजे. काश्मिरी पंडितांची घरवापसी, त्यांना सर्व सोयी सुविधा, त्यांची सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे. तिथे सामान्य जनतेचे जीवन सुद्धा असुरक्षित आहे, हे वारंवार सांगितले जात आहे. तसेच हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर या विषयाने कश्मीरी पंडितांना न्याय भेटणार नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे.