मुंबई -कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ( Patra Chawl Scam ) शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अटक केली आहे. त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यात आता ईडीला चौकशी करताना महत्वाची माहिती हाती लागली आहे. संजय राऊत यांनी अलिबागमधील 10 भूखंड खरेदी करण्यासाठी विक्रेत्यांना 3 कोटी रुपये दिले आहेत. प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊतांना ही रक्कम मिळाली होती, असेही ईडीने सांगितलं आहे.
गुरुवारी आणखी पुरावे सादर करणार -संजय राऊत यांना ईडीने रविवारी ( 1 ऑगस्ट ) सोळा तासाच्या मॅरेथॉन चौकशीनंतर मध्यरात्री अटक केली होती. सोमवारी ( 2 जुलै ) त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता, 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी संजय राऊत यांची कोठडी संपणार आहे. त्यामुळे पुन्हा न्यायालयात हजार करण्यात येणार असून, ईडी त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीला गेल्या दोन दिवसांता तपासादरम्यान, मिळालेले पुरावे सुद्धा ईडी न्यायालयासमोर सादर करणार आहे, अशी माहितीही मिळाली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.