मुंबई- शिंदे सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही राजकारण करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिल्या आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीसांनी अचानक उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. त्याबाबत संजय राऊत म्हणाले, की त्यांच्या पक्षात वरिष्ठांचे आदेश पाळण्याची परंपरा आहे. पक्षादेश पाळावा लागतो, आम्हीही पाळतो, तोच त्यांनीही पाळला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut on new government ) म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे शिंदेचे राईट हँड मॅन आहेत. दोघांनी मिळून सरकार पुढे न्यावे. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी अडथळे आणले. आम्ही पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखविले असते, तर ते अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असे म्हणणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना मानतात याचा आनंद आहे, अशी भावनाही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत आज ईडी कार्यालयात होणार हजर-ईडीने दुसऱ्यांदा नोटीस दिल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत आज दुपारी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्यांनी ही माहिती ट्विट करून ( Sanjay Raut tweet on ED notice ) दिली आहे. राज्यात सत्तांतर झाले असताना संजय राऊत हे पहिल्यांदा ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. यापूर्वी त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणार असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मी आज दुपारी १२ वाजता ईडीसमोर हजर ( ED notice Sanjay Raut ) होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो. तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन ( Sanjay Raut appeal Shivsena workers ) करतो.