मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या खासगी घरात हनुमान चालीसा बोलण्याचे आवाहन देणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. त्यांना भेटायला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर हल्ला झाला आहे. सोमैया ( Kirit Somaiya ) हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांची ही जखम सुपरफिशियल असल्याचे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांंगितले. किरीट सोमैया यांनी दिल्लीत तक्रार करताना केंद्राकडून राज्याचा अडवलेला निधी आणून सुबत्ताही सोबत आणावी, असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.
केंद्राकडून सुबत्ताही घेऊन या -मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असे आव्हान करणाऱ्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना भेटायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमैया यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनाची काच फोडण्यात आली असून त्यात सोमैया जखमी झाले. या प्रकरणी योग्य प्रकारे गुन्हा दाखल न केल्याने सोमैया दिल्लीत गेले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, किरीट सोमैया यांनी घडलं ते सांगायला दिल्लीत गेले ते ठीक आहे. पण, येताना त्यांनी नुसतेच कलह आणू नयेत. केंद्राकडून सुबत्ताही घेऊन यावी. जीएसटी आणि इतर अनेक करांचे राज्याच्या वाट्याचा निधी केंद्राने राज्याला दिलेला नाही. तो आणावा, असे आवाहन पेडणेकर यांनी केले. केंद्रीय पथकांना यायचे असेल येऊ दे. अशी अनेक पथके आली. दिल्लीचा महाराष्ट्र आणि मुंबईला आधार मिळत नाही, अशी खंत माजी महापौरांनी व्यक्त केली.