मुंबई -मुंबईमध्ये गुजराती बांधवांची भाजपाकडून घोर फसवणूक झाली. भाजपामध्ये असलेल्या गुजराती नेत्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. त्यामुळे भाजपाच्या विरोधात गुजराती समाजात तीव्र नाराजी असून ही नाराजी येत्या निवडणुकांमध्ये व्यक्त केली जाईल, यामुळे गुजराती बांधव शिवसेनेला बळकट करतील असा निर्धार आज अंधेरी येथे झालेल्या गुजराती मिळाव्यात गुजराती बांधवांनी व्यक्त केला. अंधेरी येथील गुजराती समाज सभागृहात मुंबईतील 100हून अधिक उद्योगपती, साहित्यिक आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते हेमराज शहा आणि राजुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी 'मुंबई मा जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
'आता भाजपाला आव्हान'
हेमराज शहा म्हणाले, की आम्ही मुंबईत आता भाजपाला आव्हान दिले आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईच्या परिसरात ज्या ज्या ठिकाणी गुजराती बांधवांची अधिक लोकसंख्या आहे, त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. जास्तीत जास्त लोकांना आम्ही शिवसेनेमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यातून गुजराती बांधवांची एक ताकद आम्ही दाखवून देणार आहोत. 1993च्या दंगलीत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिवसेनेने गुजराती बांधवांना मदत केली होती. त्यांचे ते योगदान आत्ताच्या गुजराती तरुण पिढीला समजले पाहिजे यासाठीचा प्रचार हा आम्ही करणार आहोत. त्यासोबतच शिवसेनेने यापुढे भाजपाला घाबरण्याचे कारण नाही, व्यापारी लोकांनी विचार करूनच सेनेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय केला आहे. शिवाय आजपर्यंत महाराष्ट्रात आणि मुंबईतील व्यापारी लोकांच्या कायमच शिवसेना पाठीशी राहिली आहे. त्यामुळे गुजराती समाज हा यापुढे शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
'गुजराती बांधवांना एकत्र करू'
नगरसेविका, राजुल पटेल म्हणाल्या, की व्यापार, जीएसटी यामध्ये आम्हाला प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत केली. गरज पडल्यास केंद्राला आमच्या गुजराती बांधवांच्या अडचणी सांगितल्या. यामुळे गुजरातमध्येही शिवसेना वाढली पाहिजे. तिकडे आपले उमेदवार उभे केले पाहिजेत, असे आवाहन केले. शिवेसना मोठी करून गुजराती बांधवांना एकत्र करू, असा विश्वास व्यक्त केला. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शिवसेनेचे स्थानिक नेते राजू पेडणेकर यांनी यावेळी मराठी, गुजराती, उत्तर भारतीय हे सर्व आपलेच आहेत. त्यामुळे शिवसेना ही आपल्या सर्वांची असल्याचे सांगत आज प्रवेश केलेल्या गुजराती बांधवांचे त्यांनी स्वागत केले.