महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aaditya Thackeray : 'माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची...'; अपात्रतेच्या नोटीसीवरुन आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला - आदित्य ठाकरे शिवसेना आमदार नोटीस

विधिमंडळ सचिवालयाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे. मात्र, माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची गरज नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला ( aaditya thackeray taunt shinde group ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By

Published : Jul 10, 2022, 4:22 PM IST

Updated : Jul 10, 2022, 4:42 PM IST

मुंबई -बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांनी दोन्ही गटातील शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये शिंदे गटाच्या 39 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे पालन न केल्याने आणि विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान केल्याचा आणि पक्षाच्या विरोधात मतदान केल्याचा आरोप दोन्ही गटांच्या आमदारांवर आहे. मात्र, या नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यावरुन आता आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"एवढं खास प्रेम करण्याचं कारण नाही" -तुम्ही वगळता इतर सर्व आमदारांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजवली आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे?, असं आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. "त्यांनी माझ्यावर एवढं खास प्रेम करण्याच कारण नाही. नाहीतर त्यांचं पाठीत खंजीर खुपसण्याचं काही कारण नव्हतं. सध्या हा न्यायप्रविष्ठ विषय आहे, उद्या न्यायालयात हा विषय येईलच. मूळ मुद्दा असा आहे कुणी कितीही बाहेर पडले तरी शिवसेना, शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसैनिकांचे प्रेम हे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार," असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं ( aaditya thackeray taunt shinde group ) आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक - राज्यपालांच्या आदेशाने विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक ३ जुलै रोजी आणि ४ जुलै रोजी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. शिंदे गटातील आमदारांनी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने तर ठाकरे गटातील शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीतील उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं. दोन्ही गटांकडून व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोप करून कारवाईची मागणी करण्यात आली.

अपात्रतेची मागणी -विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावानंतर, शिंदे गटाचे मुख्य व्हीप भरत गोगावले यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर पक्षादेश धुडकावून पक्षाच्या बाहेर मतदान केल्याबद्दल निलंबनाची किंवा अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्या आमदारांच्या यादीत आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. यामागचे कारण स्पष्ट करताना भरत गोगावले म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांचे नाव दिलेले नाही. म्हणजेच शिंदे गटाने आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केलेली नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवण्यात आली नाही.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन सुरत गाठल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली. तसेच, त्यांनी सुनील प्रभू यांची पक्षाचे मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर शिंदे सभापतींकडे वळले आणि त्यांची पुन्हा शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आणि भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, प्रतिस्पर्धी गटांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रमुख मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा -शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...

Last Updated : Jul 10, 2022, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details