महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वर्षभरापूर्वी पहाटे 'लव्ह जिहाद' होऊनही महाविकास आघाडीचे सरकार आले; शिवसेनेचा सामनातून टोला

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष म्हणून ओळखले जातात. ते लव्ह जिहादच्या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत हे माहीत असल्याने शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाकडून लव्ह जिहादचा कायदा करण्याची मागणी केली जात आहे.

By

Published : Nov 24, 2020, 10:48 AM IST

Updated : Nov 24, 2020, 11:09 AM IST

shivsena-critisized-bjp-over-love-jihad-law-in-maharashtra
शपथविधी

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपावर लव्ह जिहाद मुद्द्यावरून टीका करण्यात आली आहे. 'लव्ह जिहादच्या विषयावर बांग देऊन महाराष्ट्रातील सरकारला हादरे देऊ, या भ्रमातून भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे,' असे शिवसेनेने सामनातून भाजपाला ठणकावले आहे.

म्हणूनच मागणी केली जात आहे -

सध्या देशात 'लव्ह जिहाद'ची मोठी चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश सरकारने या संदर्भात कायदे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही 'लव्ह जिहाद'चा कायदा करावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तीन पक्षांचे आघाडीचे सरकार आहे. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष असल्यामुळे ते लव्ह जिहादच्या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत. तर, शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे भाजपा शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी महाराष्ट्रात कायदा करण्याची मागणी करत आहे.

लव्ह जिहाद हे भाजपाचे नवीन हत्यार

'भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल. आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरयाणा या भाजपशासित राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण कायद्यापेक्षा या प्रश्नी बोंबलण्याचीच उकळ जास्त फुटली आहे,' असा टोला शिवसेनेने हाणला आहे. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, जवानांचे बलिदान, कोरोनाचे संकट, आर्थिक मंदीची लाट, यापेक्षा लव्ह जिहाद हे देशासमोरचे सर्वात मोठे संकट असल्याचे भाजपाला वाटत आहे. हे सर्व बंगालच्या निवडणुकांसाठी असल्याचा टोला सामनातून भाजपाला लगावण्यात आला आहे.

लव्ह जिहादची किती प्रकरणे -

'भाजपच्या व्याख्येनुसार महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची कधी व किती प्रकरणे घडली आहेत, ते समोर आणावे. उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही,' असेही सामनात म्हटले आहे. तर, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे लव्ह जिहादविरोधात शस्त्र उचलण्याची गजर तिथे आहे. भाजपा किंवा संघ परिवाराला परक्या देशात जाऊन आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या दोन्ही देशांना दम द्यावा, किंवा एखादी सर्जिकल स्ट्राईक करावी, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

हा लव्ह जिहाद नाही का?

कश्मिरात पाकनिष्ठ, ३७० कलमप्रेमी मेहबुबा मुफ्तींशी भाजपने सत्तेचा निकाह लावला हा सुद्धा वैचारिक लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये? संघमुक्त, मोदीमुक्त भारताचा डंका पिटणाऱ्या नितीश कुमार यांना पुन्हा कडेवर घेऊन सत्तेचा निकाह लावला हा सुद्धा लव्ह जिहादचाच प्रकार का मानू नये?,' असे प्रश्न सामनातून उपस्थित केले.

हिंदुत्वाचे रक्षण फक्त निवडणुकांपुरते नसावे -

हिंदुत्वाचे रक्षण सर्वच पातळ्यावर व्हावे, फक्त रोटी-बेटी व्यवहारांपुरते वा निवडणुकांपुरते ते मर्यादीत नसावे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे. एका राज्यात कायद्याने गोमांस खाण्यावर बंदी आणायची आणि इतर भाजपशासित राज्यात खुली विक्री आणि व्यापार करायचे, अशी हिंदुत्व रक्षणाची प्रतारणा लव्ह जिहादच्या बाबतीत होऊ नये, हे भाजपाने लक्षात घ्यावे, असेही सामनातून सुनावले आहे.

हेही वाचा -'लव्ह-जिहादवर बिहारमध्ये कायदा झाल्यास आम्ही अभ्यास करून निर्णय घेऊ'

हेही वाचा -"चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करतंय आणि पंतप्रधान पाकिस्तानच्या झांज-चिपळ्या वाजवतायेत"

Last Updated : Nov 24, 2020, 11:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details