मुंबई -शिवसेनेने ताकद देऊन आतापर्यंत अनेक जणांना मोठं केलं. ज्यांना जाण आहे ते माझ्यासोबत राहिले जे विसरले ते आज कुठे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना मोठं केलं ते आज माझ्यासोबत नाहीत. पण, ज्यांच्या जोरावर हे नेते मोठे झाले ती जनता माझ्यासोबत आहे. एक गुलाबाचे झाड आहे. त्याचे आतापर्यंत तुम्ही फुल, पाहिलं गुलाब पाहिलंत. आता काटे बघाल. भाजपला हे सर्व गुलाबाचं झाड वाटत होतं. त्यांनी झाडावरची फुलं तोडून नेली. पण, संपूर्ण झाड माझ्याकडे आहे. आता या झाडाचे काटे तुम्हाला बोचतील, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांसह भाजपला दिला ( Uddhav Thackeray Warning Shinde Camp Rebel MLA )आहे. ते मातोश्रीवर आलेल्या जळगावच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते.
'आपली लढाई 2-3 पातळीवर सुरू आहे ' - सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं, हा सर्व घटनात्मक पेच आहे. आपली वकिलांची टीम आपला किल्ला भक्कमपणे लढवत आहेत. भक्कमपणे आपली बाजू मांडत आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. निकाल आपल्याच बाजूने लागेल. सध्या आपण दोन तीन पातळ्यांवर लढत आहोत. ही फक्त न्यायालयीन लढाई नाही, निवडणूक आयोगाची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे न्यायालय त्यांचं काम करेल. न्यायालय जो निकाल देईल त्याची वाट पाहू. पण या सर्व काळात तुम्ही देखील गाफील राहू नका. आपापली तयारी पूर्ण करा पुढचा काळ अधिक संघर्षाचा आहे.