मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकदा घेतलेला निर्णय परत मागे घेत नाही, यासाठी ओळखले जात होते. मात्र कृषी कायदे परत घेण्याच्या त्यांच्या निर्णयाने, त्यांच्या याच प्रतिमेला त्यांनी छेद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी तीन कृषी कायदे ( Three agricultural laws ) मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांना आपापल्या घरी परत जाण्याचे आवाहन केले. मात्र शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर तळठोकून आहेत. 'जोपर्यंत संसदेत ठराव करून हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते ( Samyukta Kisan Morcha ) सांगतात.' यामुळे पंतप्रधानांकडे लोकसभेत बहुमत असले तरी त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, हे चित्र चांगले नाही. असे शिवसेनेने दैनिक 'सामना'च्या अग्रलेखात ( Samna Editorial ) म्हटले आहे.
- 'शेतकऱ्यांचा पंतप्रधानांवर विश्वास नाही'
'देशाच्या पंतप्रधानांचा शब्द मानायला शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांचा पंतप्रधानांवर विश्वास नाही. पंतप्रधान बोलतात तसे करतीलच याची खात्री नाही. पंतप्रधानांकडे लोकसभेत बहुमत आहे, पण लोकांचा विश्वास गमावला आहे. हे चित्र चांगले नाही. लोकसभेत बहुमताच्या बळावर मंजूर केलेले कायदे बाहेर लोकांनी झिडकारले तरीही पंतप्रधान लोकांचे ऐकायला तयार नव्हते. शेवटी लोकांचा रेटा असा वाढला की, त्यांना कायदे मागे घ्यावे लागले. मोदी यांचे मन किती मोठे आहे, अशा थाळय़ा आता वाजवल्या जात आहेत, पण या काळात 700 शेतकऱ्यांनी प्राण गमावले. हे काही मोठ्या किंवा दिलदार मनाचे लक्षण नाही. म्हणूनच शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. शेतकरी म्हणतात, कायदे संसदेतच मागे घेतले पाहिजेत व तेच बरोबर आहे.' असे म्हणत शिवसेनेने शेतकरी आंदोलकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
- 'दंगली व्हाव्यात यासाठी सरकारने प्रयत्न केले'