महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळाही फुटणार - शिवसेना - सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका

पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यावरून शिवसेनेने भाजपला चांगलेच फटकारले आहे. पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली, असे म्हणत शिवसेनेने आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटणार असल्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.

Shivsena Attack on Modi Government
Shivsena Attack on Modi Government

By

Published : Nov 5, 2021, 9:40 AM IST

Updated : Nov 5, 2021, 9:57 AM IST

मुंबई -पेट्रोल-डिझेल दर कमी करण्याला भाजप नेते दिवळी गिफ्ट म्हणत आहेत, यावरुन शिवसेनेने भाजपला चांगलेच फटकारले आहे. पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली, असे म्हणत शिवसेनेने आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटणार असल्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

'...म्हणून सरकारला जाग आली' -

'केंद्र सरकारने अखेर पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना ' दिवाळी गिफ्ट ' वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी पिटत आहेत. तेरा राज्यांतील लोकसभा-विधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे ढोल मतदारांनी फोडले असले तरी त्यांचे ढोल पिटण्याची हौस काही कमी झालेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, या पोटनिवडणुकांतील पराभवामुळेच केंद्रातील सरकारला हे 'शहाणपण' आले आहे. सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्टच द्यायची होती, तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही? पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली. असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

'...तरीही पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर शंभरीपारच' -

'भयंकर इंधन दरवाढीचे जे चटके सामान्य जनता सहन करीत आहे त्याची झळ भाजपला बसली . त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आणि त्यावर ' दिवाळी गिफ्ट ' चा मुलामा चढविला गेला . पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी , तर डिझेलवरील 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे . अर्थात तरीही पेट्रोल - डिझेल प्रतिलिटर शंभरीपारच असणार आहे. तेव्हा केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी ही काही ' दिवाळी गिफ्ट ' वगैरे म्हणता येणार नाही . असे शिवसेनेने केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षाला स्पष्ट सुनावले आहे.

'दरकापातीचा देखावा'

'इंधन दरकपात होऊनही आपल्या पदरात नेमके काय पडले याचा शोध जनता घेत आहे आणि तिकडे या दरकपातीमुळे एका वर्षात 1.4 लाख कोटींचे नुकसान आपल्याला सोसावे लागणार असे म्हणून सरकार सुस्कारे सोडीत आहे. सरकारने काय ते सुस्कारे, उसासे सोडावेत, पण आवाक्याबाहेरील इंधन दरवाढ आणि आकाशाला भिडलेली महागाई यामुळे सामान्य जनतेचे जे आजवर नुकसान झाले आहे त्याचे काय? मुळात आधी भाव भरपूर वाढवायचे आणि मग किंचित कमी करून दिलासा, दिवाळी गिफ्ट वगैरे गोष्टी करायच्या असा हा इंधन दरकपातीचा देखावा' असल्याचा टोला शिवसेनेने केंद्राला लगावला आहे.

'भ्रमाचा भोपळाही फुटणार' -

'तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांत मतदारांनी 'आरसा' दाखविला नसता तर कदाचित केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःला त्या आरशात पाहण्याची तसदीही घेतली नसती. ठीक आहे . पोटनिवडणुकांतील पराभवाच्या धक्क्याने का होईना, केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी इंधन स्वस्ताईचा देखावा केला, हेही नसे थोडके. अर्थात, या देखाव्याची जनतेला भुरळ पडेल आणि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत 'मत' परिवर्तन होईल , अशी सरकार पक्षाची अपेक्षा असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळाही या पोटनिवडणुकीप्रमाणे फुटणार, हे निश्चित आहे.' भारतीय जनता पक्षाला, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

हेही वाचा - अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीची नोटीस, आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

Last Updated : Nov 5, 2021, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details