मुंबई- जेट एअरवेज ही भारतातील विमानसेवा देणारी कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. तीन ते चार महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्यांना वेतन मिळावे यासाठी भारतीय कामगार सेनेकडून कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जेट एअरवेजच्या मुंबईतील मुख्य कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे नेते आणि व्यवस्थापनमध्ये चर्चा झाली. वेतनाच्या प्रश्नावर लवकरच मार्ग काढू, असा शब्द व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.
कामगार नेते सूर्यकांत महाडिक
17 एप्रिलपासून जेट एअरवेजच्या एकाही विमानाने उड्डाण केलेले नाही. पेट्रोल भरायलाही पैसे नसल्यामुळे 25 वर्ष सेवा देणारी कंपनी आज बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जेट एअरवेजच्या 16 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नोकरी आहे पण वेतन नाही, अशी परिस्थिती आहे. तीन ते चार महिन्यापासून कामगारांना पगार मिळालेला नाही.
कंपनी व्यवस्थापन कामगारांसंबंधी नेमका काय निर्णय घेणार, या संबंधी जाब विचारण्यासाठी भारतीय कामगार सेनेकडून मोर्चा काढण्यात आला होता. जेट एअरवेजची सध्याची परिस्थिती नाजूक आहे. पंरतु, या परिस्थितीत कंपनी व्यवस्थापन काय काम करते ? यासाठी जेट एअरवेजचे सीईओ विनय दुबे आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक तसेच काही पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. सध्या कंपनीची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. बँकांनी कर्ज देण्यास नकार दर्शवला आहे. तसेच फायनान्ससाठी नवीन इन्व्हेस्टर देखील तयार होत नसल्याची माहिती विनय दुबे यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी वित्त मंत्री अरुण जेटली यांच्यासोबत कंपनी व्यवस्थानाची बैठक पार पडली असून यातून मार्ग काढण्यासाठी मदत मागण्यात आल्याची माहिती विनय दुबे यांनी दिली. त्यामुळे सरकारकडून काही मदत होऊन लवकर मार्ग निघेल, अशी आशा विनय दुबे यांनी व्यक्त केली आहे.
या कठिण परिस्थितीतून सरकार कंपनीला काहीतरी मदत करेल आणि 16 हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल अशी आशा करतो. कामगारांच्या डोळ्यासमोर खंबाटा एव्हीयेशन आणि किंगफिशर एअर लाईन या विमानसेवा कंपनीची देखील उदाहरण आहेत. त्यामुळे घाबरलेला कामगार सध्या संभ्रमात आहे. त्याला विश्वास देण्याची गरज असल्याचे मत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी सांगितले.